Latur District Bank: लातूर जिल्हा सहकार बँक निवडणुकांमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलने 'जिल्हा बँकेत कधीच विकसित राजकारण नाही' असे वाक्य बोलले, ज्याने भाजपा नेतृत्वात द्रिष्ठता उत्पन्न करावे.
आगामी काळात जिल्हा बँक ठरणार कळीचा मुद्दा!
महादेव कुंभार
लातूर (Latur District Bank) : महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू घातले असतानाच राज्याचे दस्तूरखुद्द सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 'जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही!', असे म्हणत लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील भूमिका जवळपास स्पष्ट केली. सहकार मंत्र्यांच्या या शरपंजरी वाक्बाणाने जिल्हा बँकेच्या बदनामीसाठी सरसावलेल्या भाजपातील नेत्यांच्या मनसुब्यांना जोरदार हादरा बसला आहे. एकंदर यामुळे आगामी काळात जिल्हा बँक कळीचा मुद्दा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लातूर जिल्ह्यात (Latur District Bank) सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे. लातूर, धाराशिव, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात राज्यातून विक्रमी मताधिक्य घेत विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल परवा दगडोजीराव देशमुख सभागृहात भाजपा शहर जिल्हाध्यक्षांच्या वतीने आमदार बसवराज पाटील यांचा सत्कार सोहळा चांगलाच गाजला होता. या सोहळ्यातील भाषणे बसवराज पाटील यांच्या गौरवाबद्दल कमी आणि बसवराज पाटील यांना उचकवण्याबद्दल अधिक असल्याची चर्चा सर्वत्र त्यानंतर पसरली. जणू काही बसवराज पाटलांना लातूरचे राजकारण नवे आहे, अशा पद्धतीची रचना यावेळी झालेल्या अनेकांच्या भाषणात होती.
या भाषणात आमदार संभाजीराव म्हणाले होते, 'जिल्हा बँक फार, अत्यंत शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक आहे. त्यामध्ये आपण लक्ष घालू. अनेकांना वाटते भैय्याचे नेतृत्व असावे, त्याची काही गरज नाही. आपले जे सहकार मंत्री आहेत बाबासाहेब पाटील, त्यांना भेटलो. त्यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब यांनी त्यांना सूचना दिली. आपणाला सर्वांना महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तेव्हा बाबासाहेब पाटील म्हणाले, 'आपण सर्वजण एकच आहोत... सगळे एकच आहोत!' सरकार कसं चालवायचं साहेब? आमचा प्रॉब्लेम एक होता, तो तुमच्यामुळे मिटेल, असे आम्हाला वाटत आहे, असे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर या भाषणात आमदार बसवराज पाटील यांना उद्देशून म्हणाले होते.
लातूर जिल्हा बँकेबद्दल (Latur District Bank) माजी मंत्री आमदार निलंगेकर यांनी एवढे बोलल्यानंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शनिवारी चक्क आपल्या मायभूमीतून शरपंजरी वाक्बाण सोडले. शिरूर ताजबंद येथे जिल्हा बँक शाखेच्या इमारत भूमिपूजन प्रसंगी बोलताना बाबासाहेब म्हणाले, 'माझ्या राजकारणाची सुरुवात ही गावातील सोसायटीपासून झाली. त्यानंतर आम्ही बँकेत संचालक म्हणून गेल्यानंतर बँकेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. मी आणि दिलीपराव देशमुख दोघांनी मिळून बँकेचे वसुली मेळावे घेऊन बँक सुस्थितीत आणली. आम्ही बँकेत आत्तापर्यंत चुकीचे काम कधी केले नाही व भविष्यात सुद्धा कधीही चुकीचे काम करणार नाही!जिल्हा बँकेत पक्षीय राजकारण कधीच केले नाही!',
गाजलेल्या भाषणातून...
विशेषत: बसवराज पाटील यांचे 'भाचे' अर्थात् माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे भाषण यावेळी गाजले! ते यासाठी की, काँग्रेसचे नेते माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख हे त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल सुद्धा शेतकऱ्यांच्या पैशाचे वापरतात, अशी टीका निलंगेकर यांनी यावेळी केली होती. इतकेच नव्हे, तर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोठा भ्रष्टाचार असून या बँकेवर प्रशासक नेमावा आणि मग निवडणुका घ्याव्यात, यासाठी आमदार बसवराज पाटील यांनी त्यांच्या 'लेटरपॅड'वर सरकारकडे तशी मागणी करावी, अशी भूमिकाही आमदार संभाजीरावांनी मांडली होती. याच भाषणात त्यांनी बँकेविषयी व देशमुखांविषयी गाऱ्हाणी मांडताना आमदार बसवराज पाटील (या विषयावर) बोलत नाहीत, असा खेदही व्यक्त केला होता.