Kalamnuri Firing Case: थरारक गोळीबार प्रकरणातील तपासाला वेग आला असून, अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कळमनुरी (Kalamnuri Firing Case) : शहरातील जुना बसस्थानक परिसरात १५ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील तपासाला वेग आला असून, अटक करण्यात आलेल्या ११ आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी दहा आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर २१ जुलै रोजी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याने अटक आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
या (Kalamnuri Firing Case) गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, तर चार जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील पहिल्या दहा आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान, २१ जुलै रोजी आणखी एका आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर २२ जुलै रोजी सर्व ११ आरोपींना कळमनुरी न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या प्रकरणाचा तपास सुरू असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. गोळीबारा मागील नेमके कारण, तसेच या कटात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जमीर नाईक यांनी दिली.