Municipal office fire: कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेच्या कार्यालयात आगीच्या भयानक परिणामामुळे रेकॉर्ड जळल्यामुळे महत्त्वाच्या पडताळण्यांना अडचण येती. अग्निशमन व प्रशासनाची खराबी
कोट्यवधींचा रेकॉर्ड जळाला; नागरिकांच्या हक्कांच्या नोंदी धुरात, प्रशासनावर निष्काळजीपणाचे आरोप
कळमेश्वर (Municipal office fire) : कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका कार्यालय आज पहाटे सुमारे 5.15 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जवळपास पूर्णतः जळून खाक झाले. या आगीत आरोग्य विभाग, पंतप्रधान आवास योजना (घरकुल विभाग), अग्निशमन विभाग, आवक-जावक विभाग तसेच अनेक महत्त्वाच्या शाखांमधील कागदपत्रे आणि रेकॉर्ड नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनाने प्राथमिक माहितीत बांधकाम कर विभाग आणि लेखा विभागातील काही रेकॉर्ड सुरक्षित असल्याचा दावा केला असला तरी मोठ्या प्रमाणावर शासकीय नोंदींचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
रात्रीच्या पाळीवरील कर्मचारी गुंडेराव कुंभरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला नगराध्यक्ष अविनाश माकोडे यांच्या केबिनमधून (Municipal office fire) धूर निघताना दिसला. केबिनचे दार बंद असल्याने उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि वरच्या मजल्यावरील आरोग्य विभागासह लगतचे घरकुल व अग्निशमन विभागही आगीच्या विळख्यात सापडले. आग लागल्यानंतर कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे परिसरातील विहिरीवरील मोटार पंप सुरू करता आला नाही. घटनेची माहिती तात्काळ मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांना देण्यात आली. ते नागपूरहून घटनास्थळी रवाना झाले.
अग्निशमन विभागावरही प्रश्नचिन्ह
घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नगरपालिकेची स्वतःची अग्निशमन गाडी जवळपास अर्धा ते पाऊण तास उशिराने पोहोचली. शिवाय गाडीत पुरेसे पाणी नसल्याचे कारण सांगण्यात आल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला. त्यानंतर वाडी नगरपंचायत, मोहपा नगर परिषद आणि सावनेर नगर परिषदेच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
आचारसंहितेमुळे पदाधिकारी अनुपस्थित
सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आग लागली त्यावेळी एकही प्रमुख पदाधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हता. नगरसेवक नचिकेत लंगडे व अश्विनी संजय धोंगडी यांनी मात्र घटनास्थळी धाव घेतली.
वीज वितरण कंपनीचा खुलासा
घटनास्थळी पाहणीसाठी आलेल्या महावितरणचे सहाय्यक अभियंता ढोले यांनी सांगितले की, "मीटर आणि बाह्य वीजयंत्रणा सुरक्षित असून आमच्याकडून कोणतेही शॉर्टसर्किट झालेले नाही. नगरपालिका इमारतीतील अंतर्गत विद्युत वायरिंगमधील बिघाडामुळे ही घटना घडली असण्याची शक्यता आहे."
नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना सामाजिक कार्यकर्ते राजेश श्रीखंडे
सामाजिक कार्यकर्ते राजेश श्रीखंडे यांनी घटनेनंतरही नगराध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा बहुतांश पदाधिकारी घटनास्थळी न आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. "नगरपालिकेचा इतिहासातील सर्वात मोठा अपघात घडला, पण जनतेचे प्रतिनिधी दिसले नाहीत. ही बाब अत्यंत गंभीर आहे," असे त्यांनी म्हटले.
नागरिकांना कोणता त्रास होणार?
या आगीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.
जन्म व मृत्यू नोंदी नष्ट झाल्यास प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी निर्माण होणार आहे
मालमत्ता, बांधकाम, घरकुल व करसंबंधित कागदपत्रांची पडताळणी कठीण होणार आहे
शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी पुन्हा पुरावे सादर करण्याच्या प्रक्रियेत अडकू शकतात.
न्यायालयीन व प्रशासकीय कामकाजात आवश्यक असलेल्या जुन्या नोंदी उपलब्ध न राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वारसा, मालकी हक्क, घरकुल, पाणीपुरवठा आणि कर संदर्भातील प्रकरणे वर्षानुवर्षे रखडू शकतात.
अनेक नागरिकांनी "आमच्या आयुष्यभराच्या नोंदी जळाल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार?" असा संतप्त सवाल उपस्थित केला.
प्रशासनासमोर उभे राहणारे मोठे संकट
या घटनेमुळे नगरपालिका प्रशासनालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
रेकॉर्ड पुनर्निर्माणासाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागणार असून नागरिकांच्या तक्रारी व न्यायालयीन वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे
शासनाकडून चौकशी व जबाबदारी निश्चिती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
विमा, लेखापरीक्षण आणि आर्थिक पडताळणी प्रक्रियांवर परिणाम होणार आहे
डिजिटल बॅकअप नसल्यास अनेक माहिती कायमस्वरूपी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आग टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक होत्या?
विशेष म्हणजे व्यावसायिक प्रतिष्ठानांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्रासाठी नोटिसा देणाऱ्या नगरपालिकेच्या स्वतःच्या कार्यालयातच पुरेशा अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्याचा आरोप होत आहे.
आधुनिक फायर अलार्म प्रणाली,स्मोक डिटेक्टर आणि हीट सेन्सर,प्रत्येक विभागात अग्निशामक यंत्रे,आपत्कालीन पाणीपुरवठा व्यवस्था,सर्व कागदपत्रांचे डिजिटल स्कॅनिंग व क्लाऊड बॅकअप,स्वतंत्र रेकॉर्ड रूम,विद्युत वायरिंगचे नियमित ऑडिट,कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी अग्निसुरक्षा प्रशिक्षण आदी उपाययोजना करणे अनिवार्य होते
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची भूमिका काय असायला हवी होती?
नागरिकांच्या अपेक्षेनुसार अशा गंभीर प्रसंगी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घटनास्थळी तातडीने उपस्थित राहून परिस्थितीचे नेतृत्व करणे अपेक्षित होते.त्वरित आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करून नागरिकांना अधिकृत माहिती देण्याबाबत कार्य सुरू करावे,रेकॉर्ड पुनर्संचयित करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात यावे,जबाबदारी निश्चित करून चौकशी सुरू करावी,नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मदत केंद्र उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नगराध्यक्षांच्या केबिनमधूनच धूर का निघाला?
अग्निशमन गाडी उशिरा का पोहोचली?
गाडीत पाणी का नव्हते?
फायर सेफ्टी यंत्रणा कार्यरत का नव्हती?
महत्त्वाच्या नोंदींचा डिजिटल बॅकअप होता का?
नगरपालिकेची स्वतंत्र रेकॉर्ड रूम का नव्हती?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आता चौकशीनंतरच समोर येणार आहेत.
दरम्यान, कर्मचारी हरीश देशमुख, सतीश धोटे, निशिकांत पाटील, अनिल धोटे, ओमकार घुमडे आणि मुख्याधिकारी आकाश सुरडकर यांनी जळालेल्या कागदपत्रांपैकी काही वाचविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी कळमेश्वर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता आणि नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आग दुर्घटना मानली जात असून, या घटनेने प्रशासनाच्या सज्जतेवर आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.