Nari Shakti Vandan Abhiyan: हिंगोली जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी 1500 बचत गटांच्या माध्यमातून 15850 महिलांचे संघटन झाले आहे.
नारी शक्ती वंदन अभियान:
बचत गटांच्या बळावर हिंगोली जिल्ह्यात महिलांचा सर्वांगीण विकास
हिंगोली (Nari Shakti Vandan Abhiyan) : महिला सक्षमीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक परिवर्तन यांचा प्रभावी संगम घडवून आणणारे कार्य महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय हिंगोली यांच्या माध्यमातून यशस्वीपणे सुरू आहे. नारी शक्ती वंदन अभियानाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून संघटित करून त्यांना आर्थिक, सामाजिक आणि कौशल्याधारित विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम माविमकडून सातत्याने केले जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या 4 लोकसंचालित साधन केंद्रांच्या माध्यमातून विविध विकासात्मक योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण कार्यक्रम, वॉटर डॉट ऑर्ग अंतर्गत पाणी, आरोग्य व स्वच्छता अभियान, तेजश्री फायनान्शियल सर्व्हिसेस, व्हल्नरेबल सपोर्ट प्रोग्राम, स्मार्ट प्रकल्प, जिल्हा वार्षिक योजना, लाडकी बहिण सहकारी पतसंस्था, तसेच जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह मेकॅनिझम यांसारख्या महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश आहे.
या (Nari Shakti Vandan Abhiyan) उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 1 हजार 500 बचत गटांच्या माध्यमातून तब्बल 15 हजार 850 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. सध्या 1 हजार 25 बचत गटांवर 41 कोटी 25 लाख रुपयांचे कर्ज सुरू असून महिलांनी उद्योग, व्यवसाय व रोजगार निर्मितीत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. चालू आर्थिक वर्षात 635 बचत गटांना 32 कोटी 17 लाख रुपयांचे बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ 6 हजार 650 महिलांना झाला आहे. या आर्थिक सहाय्यामुळे महिलांनी प्रक्रिया उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, बिगरशेती व्यवसाय, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, मसाले निर्मिती, लोणचे-पापड उद्योग, गारमेंट्स, हस्तकला, ट्रेडिंग, फुलशेती, मातीची भांडी, शोभेच्या वस्तू निर्मिती अशा विविध उद्योगांना सुरुवात केली आहे. अनेक महिला ‘लखपती दीदी’ बनत असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे.
महिलांच्या कौशल्यविकासासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण, उत्पादन दर्जा सुधारणा प्रशिक्षण, विपणन व्यवस्थापन, बायर-सेलर मेळावे, प्रदर्शनांद्वारे बाजारपेठ उपलब्धता अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. समान व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी क्लस्टर पद्धतीने महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. विशेष अभिमानाची बाब म्हणजे महिलांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाण 99.9 टक्के इतके आहे. यावरून महिलांमध्ये आर्थिक साक्षरता, बँक व्यवहारांची जाण आणि जबाबदारीची भावना दृढ झाल्याचे दिसून येते.
महिलांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य जनजागृती, सकस आहारासाठी सेंद्रिय परसबाग लागवड, संयुक्त मालकी हक्क जनजागृती, बेटी बचाव-बेटी पढाव, मुलीच्या जन्माचे स्वागत, जागतिक महिला दिन, सावित्रीबाई फुले जयंती, पर्यावरण दिन, वृक्षारोपण यांसारखे सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. हवामान बदल, जेंडर समता आणि सामाजिक सहभाग या विषयांवर महिलांसह पुरुषांनाही प्रशिक्षण दिले जाते. जेंडर सेन्सिटिव्ह रोल मॉडेल अवॉर्ड देऊन पुरुषांचाही गौरव करण्यात येतो. महिलांना कायदेविषयक ज्ञान मिळावे यासाठी “कायदा साथी” ही (Nari Shakti Vandan Abhiyan) संकल्पनाही प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
रानमेवा उपक्रमांतर्गत मोहफुलाचे लाडू तयार करून महिलांनी स्वतःची बाजारपेठ निर्माण केली आहे. तसेच हळद लागवड, हळद प्रक्रिया उद्योग, दूध संकलन केंद्र, लघुउद्योग विक्री केंद्र यांसारखे उपक्रम कृती संगमच्या माध्यमातून उभे करण्यात आले आहेत. (Nari Shakti Vandan Abhiyan) महिलांचा सर्वांगीण विकास, कुटुंबाचा शाश्वत विकास, समाजात सन्मान, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि आर्थिक स्वावलंबन निर्माण व्हावे, या उद्देशाने माविममार्फत विविध योजना राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी दिली आहे.