Government schools closed: शहरातील एका खासगी कन्या शाळेत १८०० पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असताना सरकारी कन्या शाळा बंद पडली. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने शाळा वाचविण्या ऐवजी गुपचूप...
हिंगोली (Government schools closed) : शहरातील एका खासगी कन्या शाळेत १८०० पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिक्षण घेत असताना सरकारी कन्या शाळा बंद पडली. विशेष म्हणजे शिक्षण विभागाने शाळा वाचविण्या ऐवजी गुपचूप शिक्षकांचे इतरत्र समायोजन करून मुलींना सहशिक्षणात प्रवेश दिला आहे. शिक्षण विभाग व जिल्हा परिषद प्रशासनाने या शाळांबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
१९५२ पासूून हिंगोली शहरात चालत असलेली (Government schools closed) जिल्हा परिषद कन्या प्रशाला य शैक्षणिक वर्षात बंद पडली आहे. हिंगोली शहरासहीत जवळपासच्या गावांतून येणार्या मुली या शाळेत शिकत होत्या. शहरातील एकमेव प्रशस्त क्रिडांगण असलेल्या या शाळेची इमारतही तशी प्रशस्तच आहे; परंतु पटसंख्या नसल्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून हिंगोलीतील जिल्हा परिषद कन्या शाळा बंद पडली आहे. एकीकडे सरकारी शाळा बंद पडत असताना सरजूदेवी भिकुलाल भारूका आर्य कन्या विद्यालय ही खासगी शाळा १८३० मुलींना शिक्षण देत आहे. दयानंद शिक्षण संस्थेच्या या शाळेत शैक्षणिक उपक्रम पुर्वीपासून काटेकोरपणे चालविला जातो. पहिल्या सहामाहीत दोन चाचणी परीक्षा, अर्धवार्षिक परीक्षा, दुसर्या सहामाहीत परत दोन चाचणी परीक्षा, सराव परीक्षा व शेवटी वार्षिक परीक्षा असा व्यवस्थित शैक्षणिक कार्यक्रम या शाळेत राबविला जातो. या सोबतच स्काऊट - गाईड, एनसीसी, देशी - विदेशी खेळांसहीत अनेक उपक्रम येथे राबविले जातात. या तुलनेत जिल्हा परिषद कन्या प्रशालेत प्रशासन कुठे कमी पडले याचेच आत्मचिंतन व्हायला हवे.
अलीकडे विद्यार्थ्यांचा व पालकांचा कल सीबीएसई शाळांकडे वाढत आहे. अशात शासकीय शाळांना अधिक प्रयत्न करण्याची गरज असताना शिक्षण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कन्या शाळेच्या या दुरावस्थेबाबत प्रशासन काय कारवाई करते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गरीब मुलींसाठी शिक्षणाचे दार झाले बंद
माध्यमिक शाळेत राजपत्रित मुख्याध्यापक पदे मागील १०ते १२ वर्षापासुन भरले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी, गणित व विज्ञान या महत्त्वाच्या विषयाला शिक्षक नियुक्त केले नाहीत. जिल्हयातील एकमेव मुलीसाठी असलेली शाळा बंद म्हणजेच गरिबांच्या मुलीसाठी शिक्षणाचे दार बंद झाले. फार वेदनादायक निर्णय आहे. जिल्हा परिषदेची एकमेव मुलींसाठी असलेली माध्यमिक शाळा बंद झाल्याने स्वतंत्र मुलींसाठी माध्यमिक शाळा राहीली नाही, परिणामी गोरगरीबांच्या मुलींना खासगी शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. ही इमारत आता विद्यार्थिनी व शिक्षकाविनाच दिसणार आहे.
- सुभाष जिरवणकर, राज्य कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, न.प, मनपा सेवानिवृत्त प्रा. शिक्षक संघ
शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे ही दुरावस्था
ह नेत्यांच्या खाजगी शाळा व इंग्रजी शाळा ह्या गल्लोगल्ली उघडून ठेवल्या मुळे आणि जिप शाळा मध्ये जाणीव पूर्वक शिक्षकांची पदे रिक्त ठेवल्या मुळे गुणवत्तेवर परिणाम होऊन विद्यार्थी संख्या रोडावली परिणामी जिप शाळा बंद होऊ लागल्या.
-मनोहर पोपळाईत
विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे
वर्षभरात घेतल्या जाणार्या चाचणी परीक्षा व सराव परीक्षामधून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख कळत असतो. याकरीता प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष देणे गरजेचे असते. शिवाय गणित, विज्ञान व इंग्रजी सारख्या विषयावर अतिरिक्त लक्ष द्यावे लागते. परिश्रमपूर्वक मराठी माध्यमात शिकविले गेलेले विद्यार्थी केवळ सीबीएसई नाही तर आयसीएसई मधून येणार्या विद्यार्थ्यांशीही ग्रामीण विद्यार्थी स्पर्धा करू शकतात. या पध्दतीमुळेच आमच्या शाळेतील अनेक मुली वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाल्या आहेत.
-अनिल ओमप्रकाश भारूका सचिव, दयानंद शिक्षण संस्था, हिंगोली