महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ताप, अशक्तपणा आणि थकव्यामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल; अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान प्रकृती खालावली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द
मुंबई (Health Update) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ताप, अशक्तपणा आणि प्रचंड थकवा जाणवत असल्याची तक्रार केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सध्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानच एकनाथ शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली सततची धावपळ, राजकीय बैठका आणि दौऱ्यांमुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण आला होता. प्रकृती अधिक बिघडताच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांचे दिवसातील सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले आणि त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एकनाथ शिंदे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा परिणाम काही महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमांवरही झाला. धुळ्यातील ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता ठाण्यातील 'गंगुबाई शिंदे हॉल' येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर मध्यरात्री सुमारे २ वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत राज्यातील राजकीय घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त होते. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत ठाकरे सेनेचे सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दिल्ली आणि मुंबईदरम्यान वारंवार प्रवास, बैठका आणि राजकीय हालचाली सुरू होत्या. या सततच्या दगदगीचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेचे कोणतेही कारण नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले असून, डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.