शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या योजनेतील जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे नाव देऊन अपमान केल्याचा आ. रोहीत पवारांचा आरोप
हिंगोली (Farmer Loan Waiver) : शेतकरी कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या योजनेतील जाचक अटींमुळे ७० टक्के शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने योजना आणूनही सामान्य गरीब शेतकऱ्याला न्याय न मिळणे हा त्या महामानवाचा अपमान असल्याची टीका त्यांनी हिंगोली येथे पत्रकार परिषदेत केली.
हिंगोली येथे २६ जून रोजी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, २ जून रोजी सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यांनी सरकारचे अभिनंदन केले होते. तसेच शेतकरी, महिला सबलीकरण आणि धार्मिक चळवळीसाठी कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने योजना सुरू केल्याबद्दल सरकारचे आभारही मानले होते. मात्र शासन निर्णयाचा (जीआर) अभ्यास केल्यानंतर त्यामध्ये अनेक जाचक अटी असल्याचे समोर आले. या अटींमुळे सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचा दावा त्यांनी केला.
रोहित पवार म्हणाले की, सामान्य लोकांना सरसकट न्याय मिळावा यासाठी महामानवांनी आयुष्यभर कार्य केले. त्यामुळे त्यांच्या नावाने योजना आणताना ती विनाअट सरसकट कर्जमाफीची असायला हवी होती. मात्र सरकारने आमचे ऐकले नाही. त्यामुळे १२ जुलैपासून पंढरपूरच्या पवित्र भूमीत आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरी संप्रदायातील ९९ टक्के वारकरी हे शेतकरी असून, सध्या शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील कर्जवाटपाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी हिंगोली जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले. त्यापैकी जिल्हा बँकेकडून केवळ २२० कोटी रुपये वितरित करण्यात आले, तर उर्वरित कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी दिले. शेतकरी आणि शेतमजूर अडचणीत असतील तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते आणि त्याचा परिणाम शहरी अर्थव्यवस्थेवरही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हा विषय हाती घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांची विनाअट सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, या मागणीसाठी २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. हे आंदोलन शांततेत करण्यात येणार असून, प्रशासनाने बळाचा वापर केल्यास जेलभरो आंदोलनही करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह राज राजापूरकर, विकास लवांडे, डॉ. नरेंद्र काळे, प्रशांत बोराडे, भगवान आलेगावकर, अॅड. रवि शिंदे, बंडू मुटकुळे, गणेशराव गडदे, मनीष आखरे, माधव कोरडे, धीरज काकडे, डॉ. संतोष बोंढारे, गजानन गव्हाणे, मुजीब पठाण, मोईन बागवान, अॅड. शेख मोसिन, डॉ. वेदांत मरळे, प्रा. गजानन थोरात, सोनू चव्हाण, दिलीप लाखोंचे, सुशील बोंढारे, अभिजीत देशमुख, रमेश जाधव, सिराज कुरेशी, आयुब पठाण, यशवंत देशमुख, व्यंकटेश जोगदंड, सुनील मस्के, उत्तम पोटे, ज्ञानेश्वर होडबे, दत्ता गिरी, प्रमोद वडकुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.