नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई आणि तिच्या विवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
नागपूर (Family Dispute Case) : नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आई आणि तिच्या विवाहित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली असून कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव हे या टोकाच्या पावलामागील कारण असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. मृतांमध्ये संगीत ढबाले (आई) आणि आकांक्षा ब्रम्हे (मुलगी) यांचा समावेश आहे. दोघीही नंदनवन परिसरात एकाच घरात वास्तव्यास होत्या. बुधवारी रात्री उशिरा त्यांनी घरातील लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींना खाली उतरवत रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
आई आणि मुलगी मानसिक तणावाखाली असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आकांक्षा ब्रम्हे हिचा विवाह सुमारे दोन वर्षांपूर्वी लोकेश ब्रम्हे याच्यासोबत झाला होता. काही महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता, मात्र त्या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर ती गंभीर मानसिक तणावात होती आणि काही काळापासून आईकडे राहत होती.
दरम्यान, आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे याच्यासोबत संपत्तीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. शेती, घर आणि इतर मालमत्तेच्या वाटणीवरून कुटुंबात तणाव वाढत असल्याचेही सांगितले जात आहे. 30 एप्रिलच्या रात्रीही लोकेश घरी आला असता पुन्हा वाद झाल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या सततच्या भांडणांमुळे आणि मानसिक दबावामुळे आई–मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी पोलिसांना एक सुसाइड नोट देखील सापडली आहे. त्यामध्ये अंत्यसंस्कार गावात वडिलांच्या ठिकाणी करण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त करण्यात आली असून सासरच्या मंडळींकडे मृतदेह देऊ नये, असेही नमूद असल्याची माहिती आहे.
नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून पती लोकेश ब्रम्हे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.