बनावट वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केल्याच्या गाजत असलेल्या मोहम्मद खतिब उर्फ डॉ. राज खतिब प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे.
मुंबई : बनावट वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवून आर्थिक फसवणूक केल्याच्या गाजत असलेल्या मोहम्मद खतिब उर्फ डॉ. राज खतिब प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वाची कारवाई केली आहे. या तपासादरम्यान नाव समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक (PSI) संजय रामभाऊ जाधव याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट-3 ने केली.
हे प्रकरण गुजरातमधील रिअल इस्टेट व्यावसायिक नितीन चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2020 मध्ये मोहम्मद खतिब, संजय जाधव आणि महसब घौस खतिब यांनी चौधरी यांना त्यांचा मित्र अल्पेश पटेल याला 1 कोटी रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या व्यवहारासाठी 10 लाख रुपयांचे कमिशन रोख स्वरूपात स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र, दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तपासादरम्यान गोळा करण्यात आलेल्या तांत्रिक पुराव्यांमधून संजय जाधव आणि मोहम्मद खतिब यांच्यात सातत्याने संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मुंबई विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये जाधव हा खतिबसोबत उपस्थित असल्याचेही तपासात समोर आले. त्यावेळी त्याने स्वतःची ओळख गुन्हे शाखेतील अधिकारी म्हणून करून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याशिवाय संजय जाधव याच्याविरोधात यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याविरुद्ध 2022 मध्ये वाशी पोलीस ठाण्यात, तर 2024 मध्ये सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मोहम्मद खतिबच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दक्षिण मुंबईतील एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत खतिबवर तिच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचाही आरोप तिने केला आहे. याशिवाय फार्मास्युटिकल वितरण व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवत 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून धमेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. तो तब्बल 28 वर्षे डॉक्टर म्हणून वावरत असल्याचा आरोप आहे. संपूर्ण रॅकेटचा गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असून, पुढील चौकशीत आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.