भारत माध्यमिक शाळा, चिं.पेन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
रिसोड (Educational Kit Distribution) : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये चांगले संस्कार रुजावेत या उद्देशाने भारत माध्यमिक शाळा, चिं.पेन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन शिक्षक युवराज देशमुख यांनी केले. शाळेचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक विनोदराव देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
शिक्षक युवराज देशमुख हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून, दरवर्षी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. मात्र, त्यांचे कार्य केवळ साहित्य वितरणापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या जीवनात मूल्यशिक्षण आणि सुसंस्कार रुजविण्यावरही त्यांचा विशेष भर आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी दररोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावून "शुभं करोति कल्याणम्" म्हणतात. तसेच सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आई-वडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय त्यांनी अंगीकारली आहे. यासोबतच प्रत्येक विद्यार्थी नियमित वेळापत्रक तयार करून अभ्यास करत असून शिस्तबद्ध, संस्कारक्षम आणि जबाबदार विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करत आहे.
युवराज देशमुख यांचे मत आहे की, "केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कार, शिस्त, पालकांचा आदर आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी हेच विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे आधारस्तंभ आहेत." या विचारातून ते विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त करत युवराज देशमुख यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळण्याबरोबरच सुसंस्कारित, शिस्तप्रिय आणि जबाबदार नागरिक घडण्यास निश्चितच हातभार लागत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.