Delhi Students Lathi-charge: संसद भवनावर निघालेल्या विद्यार्थी मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कळमनुरी वकील संघाने आज महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले.
कळमनुरी (Delhi Students Lathi-charge) : शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी २० जुलै २०२६ रोजी संसद भवनावर निघालेल्या विद्यार्थी मोर्चावर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कळमनुरी वकील संघाने आज महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले. हे निवेदन उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार श्री. किन्होळकर यांच्यामार्फत देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात वकील संघाने म्हटले आहे की, २० जुलै रोजी लाखो विद्यार्थी शांततेत मोर्चा काढत असताना दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हजारो विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, राष्ट्रीय परीक्षा संस्था बरखास्त करण्यात यावी, NEET 2026 मधील पेपरफुटी आणि निकालातील घोटाळ्यांची पारदर्शक चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. वकील संघाने वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा राज्यस्तरावरच घेण्यात याव्यात अशी भूमिका मांडली. NEET परीक्षेतील घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या 23 विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे आणि शिक्षणाचे खाजगीकरण बंद करावे अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या.
निवेदन देण्यापूर्वी कळमनुरी वकील संघाच्या सदस्यांनी न्यायालय परिसरातून उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात वकील विद्यार्थी एकजुटीचा विजय असो" अशा घोषणा देत वकिलांनी परिसर दणाणून सोडला.
या (Delhi Students Lathi-charge) आंदोलनात कळमनुरी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. इफ्तेखार नाईक, उपाध्यक्ष ॲड. सुनील घोंगडे, सचिव ॲड. प्रभाकर मोरे, माजी अध्यक्ष ॲड. रवि शिंदे यांच्यासह ॲड. मोहम्मद इकबाल, ॲड. के.पी. जोंधळे, ॲड. अझरुद्दीन कादरी, ॲड. शाकेर सिद्दीकी, ॲड. लुगडे पाटील, ॲड. डी.एस. पाईकराव, ॲड. एल.एल. सिरसाट, ॲड. एस.टी. नरवाडे, ॲड. जे.आर. जाधव, ॲड. जी.एम. नागरे, ॲड. अविनाश काळे, ॲड. डी.पी. जाधव, ॲड. मल्हारी खोकले, ॲड. कुणाल इंगोले, ॲड. अझर पठाण, ॲड. गुणरत्न पतंगे, ॲड. महेंद्र खिल्लारे, ॲड. धम्मानंद सोनुले, ॲड. शेख शकील, ॲड. बुद्धरत्न बलखंडे, ॲड. पी.के. तडस, ॲड. एस.एम. अली आणि ॲड. झिशान नाईक आदी वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.