Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > पुणे

Crime Reconstruction

लोहगडावर चेतन चौधरीकडून गुन्ह्याचे रिक्रिएशन; सिया-चेतन ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.


लोहगडावर चेतन चौधरीकडून गुन्ह्याचे रिक्रिएशन सिया-चेतन ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत

Crime Reconstruction |

केतनला दरीत कसे ढकलले याचा घटनास्थळी घेतला आढावा; तपासाला वेग, बचाव पक्षाने पुराव्यांवर उपस्थित केले प्रश्न

पुणे (Crime Reconstruction) : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. न्यायालयाने दोघांनाही ३ जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या कालावधीत तपास यंत्रणा विविध पुरावे आणि घटनाक्रमाची पडताळणी करत आहे.

तपासाचा भाग म्हणून लोणावळा पोलिसांनी बुधवारी आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन गुन्ह्याचे घटनास्थळी पुनर्निर्माण (सीन रिक्रिएशन) केले. केतन अग्रवाल याला ज्या ठिकाणावरून दरीत ढकलल्याचा आरोप आहे, त्याच ठिकाणी चेतनकडून केतनच्या पुतळ्याचा वापर करून संपूर्ण घटनाक्रमाची पुनरावृत्ती करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनच्या मृत्यूच्या दिवशी चेतनने परिधान केलेल्या वेशभूषेतच त्याला लोहगडावर आणण्यात आले होते. सुमारे २ तास ४० मिनिटे हे रिक्रिएशन सुरू होते. तसेच त्या दिवशी सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती चेतन चौधरीच असल्याची पडताळणीही पोलिसांनी केली.

यापूर्वी २८ जून रोजी मुख्य आरोपी सिया गोयललाही लोहगडावर नेऊन घटनास्थळी रिक्रिएशन करण्यात आले होते. त्यानंतर आता चेतन चौधरीकडून घटनाक्रमाची पुनर्रचना करून केतनला नेमक्या कोणत्या पद्धतीने किल्ल्यावरून खाली ढकलण्यात आले, याबाबत पोलिसांनी माहिती संकलित केली.

दरम्यान, या प्रकरणात अग्रवाल कुटुंबीयांनीही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, सियाने केतनला लोहगडावर नेण्याचा सातत्याने आग्रह धरला होता. कुटुंबीयांनी परवानगी नाकारूनही १२ दिवसांत चार वेळा तिने लोहगडावर जाण्याचा आग्रह केला. केतनला डोंगर-दऱ्यांमध्ये फिरण्याची आवड असल्याचा फायदा घेत हा कट रचल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अग्रवाल कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ३० मे रोजी प्रथम परवानगी मिळाली होती. त्यानंतर ४ जून रोजी परवानगी नाकारल्यानंतर सियाने तीव्र नाराजी व्यक्त केली. अखेर १८ जून रोजी वाढदिवसाचे कारण सांगून तिने केतनला लोहगडावर नेले आणि किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

याचदरम्यान, पोलिसांनी सियाचे वडील प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांचीही चौकशी केली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सियाने लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणे सोपे वाटल्याचे सांगितले. नोव्हेंबरमध्ये होणारे लग्न मोडल्यास कुटुंबीयांच्या भावना दुखावतील, अशी तिची भावना होती. त्यामुळे लग्न रद्द करण्याऐवजी होणाऱ्या पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतल्याची कबुली तिने चौकशीत दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, आरोपी चेतन चौधरीचे वकील राधेशिकेश उत्तरवार यांनी या प्रकरणातील सर्व आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध व्हायचे असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी मांडलेला घटनाक्रम सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे सादर करावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून घटनास्थळाचे पुनर्निर्माण, गेट ॲनालिसिससह विविध तांत्रिक तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पोलिसांकडे कोणते ठोस पुरावे आहेत, हे स्पष्ट होईल. बचाव पक्षाचे लक्ष पर्यायी घटनाक्रम मांडण्यापेक्षा तपास यंत्रणेकडून सादर होणाऱ्या पुराव्यांची अचूकता आणि त्यातील त्रुटी तपासण्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Related to this topic: