अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
सदाशिव पाटील यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा; नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी व्यक्त केली असहमती
अंबरनाथ (Corruption Statement) : अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. विविध विकासकामांमधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना "भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, मात्र त्याची टक्केवारी कमी असली पाहिजे," असे त्यांनी सभागृहातच म्हटल्याने उपस्थित सदस्यांसह नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शुक्रवारी अंबरनाथ नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत विविध विकासकामांतील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर चर्चा सुरू होती. याचवेळी उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचाराबाबत केलेल्या टिप्पणीमुळे वातावरण अचानक तापले. सभागृहात अध्यक्षस्थानी बसून त्यांनी "भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण टक्केवारी कमी असली पाहिजे," असे वक्तव्य केले.
त्यांच्या या विधानानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उपनगराध्यक्षांच्या शेजारी बसलेल्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी त्यांना लगेच थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, "खरं बोलायला कसली भीती? कोणी फाशी थोडीच देणार आहे," असे म्हणत सदाशिव पाटील यांनी आपले वक्तव्य योग्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहातील चर्चेने अधिकच वादग्रस्त वळण घेतले.
सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. त्यानंतर सभागृहाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सदाशिव पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळाच अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आपण "भ्रष्टाचार होऊ नये" या अर्थाने बोललो होतो, असा दावा त्यांनी केला. मात्र, सभागृहातील व्हिडिओ आणि त्यांच्या प्रत्यक्ष वक्तव्यामुळे त्यांच्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
याप्रकरणात आणखी एक वाद तेव्हा निर्माण झाला, जेव्हा कॅमेरे बंद झाल्यानंतर पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण प्रकरण अधिकच चर्चेत आले असून पत्रकार संघटनांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी उपनगराध्यक्षांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनीही अशा प्रकारच्या विधानाचे समर्थन करता येणार नसल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.
अंबरनाथ पालिकेतील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. सार्वजनिक व्यासपीठावर भ्रष्टाचारासंदर्भात करण्यात आलेल्या या वक्तव्यामुळे महायुतीची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या या वादग्रस्त विधानाची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जाणार का, तसेच त्यांच्यावर कोणती शिस्तभंगाची कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.