कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केलेल्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे.
आरटीआय कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर अभिजीत दिपके यांची प्रतिक्रिया; ५ तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP ची बैठक, राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबतही स्पष्ट भूमिका
कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी केलेल्या मागणीवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले आहे. भगवान दीपके यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिपके यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबतही भूमिका स्पष्ट केली.
सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना अभिजीत दिपके म्हणाले की, "आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पदवी सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा संपूर्ण तपशील जाहीर करेन. माझी पदवी खरी आहे आणि नरेंद्र मोदी यांची पदवीही खरी असेल, अशी मला अपेक्षा आहे."
दरम्यान, येत्या ५ तारखेला छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी कॉकरोच जनता पार्टीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाचे प्रवक्ते तसेच आंदोलन यशस्वी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीत कॉकरोच जनता पार्टीच्या भविष्यातील वाटचालीचा आराखडा, संघटनात्मक विस्तार आणि आगामी रणनीती यावर सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती अभिजीत दिपके यांनी दिली. गेल्या काही दिवसांत विविध राजकीय नेते आणि इतर व्यक्ती भेटीसाठी येत असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, सध्या CJP कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नाही. तसेच आवश्यकता भासल्यास पुन्हा जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यासही आपण तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.
CJP राजकारणात उतरणार का?
कॉकरोच जनता पार्टी राजकीय पक्ष म्हणून निवडणूक राजकारणात उतरणार का, या प्रश्नावरही अभिजीत दिपके यांनी भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अनेकांना आम्ही राजकीय पक्ष स्थापन करावा असे वाटत असले तरी सध्या तरी तसा कोणताही विचार किंवा उद्देश नाही. ही एक जनचळवळ म्हणूनच पुढे नेण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना दिपके म्हणाले की, "नवीन राजकीय पक्ष स्थापन करून काय साध्य होणार? निवडणुकांमध्ये मतं डिलीट होतात, सकाळी जनता एका उमेदवाराला निवडते आणि संध्याकाळी सरकार वेगळ्याच पक्षाचे बनते. निवडून आलेले आमदार-खासदार पक्ष बदलतात. ईडी, सीबीआयच्या कारवायांमुळे पक्ष फोडले जातात आणि निवडणुका हायजॅक केल्या जातात. अशा परिस्थितीत राजकीय पक्ष स्थापन करण्याचा उद्देश काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.