जिंतूर तालुक्यातील बामणी येथे शनिवारी (दि.) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारचा अपघात घडल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली.
गट विस्तार अधिकारी जखमी; मद्यधुंद अवस्थेचा दावा, पोलिसांकडून तपास सुरू; आर्थिक तडजोडीचीही चर्चा
परभणी : जिंतूर तालुक्यातील बामणी येथे शनिवारी (दि.) सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारचा अपघात घडल्याने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. वाहनावरील ताबा सुटल्याने कारने प्रथम रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिली आणि त्यानंतर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर जाऊन आदळली. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून गट विस्तार अधिकारी आर. एस. इडोळे जखमी झाले आहेत. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्पा येथे चौकशीसाठी जात असलेले गट विस्तार अधिकारी आर. एस. इडोळे व त्यांच्यासोबत असलेले ग्रामसेवक हे चारचाकी वाहनाने बामणी मार्गे प्रवास करत होते. कार स्वतः इडोळे चालवत असल्याचे सांगण्यात आले.
बसस्थानकाजवळ आल्यानंतर अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने कारने प्रथम रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीचे नुकसान झाले. त्यानंतर कार समोरून येत असलेल्या राहुल डाखूरे यांच्या मोटारसायकलच्या दिशेने वेगाने गेली. मात्र, डाखूरे यांनी प्रसंगावधान राखत मोटारसायकल बाजूला घेतल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
भरधाव कारचा वेग इतका होता की, पुढे जाऊन ती थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यावर आदळली. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कारमधील गट विस्तार अधिकारी यांना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी संबंधित अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा केला. मात्र, याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नसून वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.