अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवायांची व्याप्ती आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयापर्यंत पोहोचली आहे.
BMC मुख्यालयातील कॅन्टीनमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन; AI-आधारित तक्रार पोर्टलद्वारे नागरिकांना भेसळयुक्त अन्न व औषधांविरोधात तक्रार करण्याची नवी सुविधा
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या धडक कारवायांची व्याप्ती आता थेट बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुख्यालयापर्यंत पोहोचली आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील कॅन्टीनवर FDA ने अचानक तपासणी करून स्वच्छतेसंदर्भातील त्रुटी आढळल्याने संबंधित कॅन्टीन सील करण्यात आले. या कारवाईमुळे महापालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या भोजन व्यवस्थेवर तात्पुरता परिणाम झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून राज्यातील विविध लहान-मोठ्या हॉटेल्स, खाद्य आस्थापना आणि खाद्य व्यवसायांवर कठोर कारवाया सुरू आहेत. त्याच मोहिमेचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील कॅन्टीनची तपासणी करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार, या कॅन्टीनमध्ये दररोज सुमारे 7 ते 8 हजारांहून अधिक नागरिक आणि कर्मचारी जेवण घेतात. कॅन्टीन सील झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःचा डबा घेऊन कार्यालयात यावे लागले.
याआधीही FDA ने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत मुंबईतील प्रसिद्ध के. रुस्तम आईस्क्रीम पार्लर, शालीमार रेस्टॉरंट आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंट यांच्या परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. या सलग कारवायांमुळे खाद्य व्यवसायांमध्ये नियमांचे पालन करण्याबाबत अधिक सतर्कता निर्माण झाली आहे.
दरम्यान, मुंबईच्या मरीन लाइन्स परिसरातील 110 वर्षांहून अधिक जुने आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या पारशी डेअरी फार्मवरही FDA ने कारवाई केली आहे. 1916 मध्ये स्थापन झालेल्या या प्रतिष्ठित संस्थेची तपासणी बुधवारी करण्यात आली. तपासणीदरम्यान स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत संस्थेचा परवाना निलंबित करण्यात आला.
याचबरोबर नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधे आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित तक्रारी सहजपणे नोंदवता याव्यात यासाठी FDA ने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नागरिक तक्रार पोर्टल सुरू केले आहे. या नव्या प्रणालीद्वारे नागरिक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलून तक्रार नोंदवू शकतात.
या उपक्रमाबाबत माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, सुशासनाचा अर्थ केवळ तंत्रज्ञानाचा वापर नसून नागरिकांसाठी शासन अधिक सुलभ, जलद आणि उत्तरदायी करणे हा आहे. AI प्रणाली नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रार आपोआप स्पष्ट स्वरूपात तयार करते, ती संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठवते, विलंब झाल्यास स्वयंचलित एस्कलेशन करते आणि संपूर्ण तक्रार प्रक्रियेचा पारदर्शक मागोवा घेण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
फेसबुकवरील पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले आहे की, भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट, निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत तक्रार नोंदवणे आता अत्यंत सोपे झाले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या AI-आधारित व्यासपीठावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत माहिती दिल्यास प्रणाली आपोआप स्पष्ट आणि संपूर्ण तक्रार तयार करून पुढील कार्यवाहीसाठी पाठवते. नागरिकांचा सक्रिय सहभाग, आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तरदायी प्रशासन यांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य संरक्षण अधिक प्रभावी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.