Sant Muktabai Palkhi: 'भेटीलागी जीवा लागलीसे आस ,पाहे रात्रं दिवस वाट तुझी', या अभंगाप्रमाणे संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे भूम शहरात शुक्रवारी (दि.१७) आगमन होताच जोरदार आतीषबाजी
भूम (Sant Muktabai Palkhi) : 'भेटीलागी जीवा लागलीसे आस ,पाहे रात्रं दिवस वाट तुझी', या अभंगाप्रमाणे संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे भूम शहरात शुक्रवारी (दि.१७) आगमन होताच जोरदार आतीषबाजी करत पालखी आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी करत पालखीचे दर्शन घेतले. दरम्यान श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी येथील नगरपालिका चौकात संत मुक्ताबाई यांच्या पालखीला गोल रिंगण केले. हा सोहळा भूमकरांनी मोठ्या उत्साहात पाहण्याचा आनंद घेतला.
संत मुक्ताबाई पालखीचा (Sant Muktabai Palkhi) आजचा २२ वा मुक्काम असून पालखीला ६०० किलोमीटर अंतर कापत ३० दिवस पंढरपूरपर्यंत पोहोचते. या पालखीसोबत लहान-मोठ्या १३० दिंड्या सहभागी झाल्या असून पालखी सोहळ्याचे हे ३१९ वे वर्ष आहे. हा पालखी सोहळा सहा जिल्ह्यांमधून मार्गस्थ होऊन पंढरपूरला पोहोचतो.

शुक्रवारी सकाळी येथील वाशी रोड मार्गे चौंडेश्वरी मंदिर येथे पालखी सोहळा विसावला. येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळचा नाश्ता नागोबा तरुण मंडळाच्या वतीने तर कोष्टी समाज बांधवांच्या वतीने भोजन वारकऱ्यांना देण्यात आले. तसेच हा पालखी सोहळा रवींद्र हायस्कूल येथे मुक्कामी राहून शनिवारी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.
शहरात पालखी सोहळा पोहोचल्यानंतर नगरपरिषदेसमोर नगराध्यक्षा संयोगिता गाढवे व माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी मनोभावे पूजन केले.
तसेच जनशक्ती नगर विकास आघाडीच्यावतीने गटनेते रुपेश आप्पा शेंडगे, बांधकाम सभापती अनिल शेंडगे, पाणीपुरवठा सभापती नवनाथ रोकडे, नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, नगरसेवक विठ्ठल बागडे, नगरसेवक अमोल गाडे, अलमपभु यात्रा कमिटीचे अध्यक्ष दिलीप शाहू, महाराज विश्वस्त हरिभाऊ पवार, रमेश मसकर, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर यांनीही दिंडीचे स्वागत केले. यावेळी सुरज गाढवे, अभिजीत शेटे, रीमा शिंदे, भाग्यश्री माने, दिलीप गाढवे, कैलास पवार यांच्यासह नगर परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, सर्व नगरसेवक उपस्थित होते.