Jamgavhan Gram Panchayat: औंढा तालुक्यातील जामगव्हाण ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाच्या तक्रारी आणि चौकशीतील दिरंगाईचे प्रकरण अधिकच चिघळले
चौकशी रखडल्याने संताप, कामाच्या ठिकाणी धमकी प्रकरणी गुन्हा दाखल
"स्मशानभूमीचे काम थांबवा, अन्यथा विष प्राशन करीन," औंढा पंचायत समिती मधील घटना
औंढा नागनाथ (Jamgavhan Gram Panchayat) : औंढा तालुक्यातील जामगव्हाण ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, माहिती अधिकार कायद्याच्या उल्लंघनाच्या तक्रारी आणि चौकशीतील दिरंगाईचे प्रकरण अधिकच चिघळले आहे. ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहारा बाबत चार महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या तक्रारीवर अद्याप चौकशीचे आदेश न झाल्याचा आरोप करत तक्रारदाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. त्याचवेळी ग्रामपंचायतीच्या विकासकामाच्या ठिकाणी झालेल्या वादानंतर तक्रारदाराच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
तक्रारदार विजय पंजाबराव लेकुळे (रा. जामगव्हाण) यांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात ग्राम पंचायतीतील विविध विकासकामांमध्ये निधीचा कथित गैरवापर, बनावट मस्टर तयार करणे, कागदपत्रांमध्ये फेरफार तसेच माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागविलेली माहिती न दिल्याचे गंभीर आरोप केले आहेत. चार महिने उलटूनही चौकशीचे लेखी आदेश निघाले नसल्याचा दावा करत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. येत्या १५ दिवसांत चौकशीचे लेखी आदेश काढून प्रत्यक्ष चौकशी सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत ग्रामपंचायतीच्या खर्चाचा तपशील, मस्टर, ठराव, लाभार्थी यादी आणि इतर कागदपत्रांची मागणी करूनही ती निर्धारित मुदतीत उपलब्ध करून देण्यात आली नाही. प्रथम अपील करूनही निर्णय न झाल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर माहिती अधिकार कायद्यानुसार दंडात्मक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, मंगळवारी (Jamgavhan Gram Panchayat) जामगव्हाण येथील स्मशानभूमी विकासकामाच्या ठिकाणी झालेल्या वादातून सरपंच पि बी मुकाडे यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विजय लेकुळे यांनी केला आहे. या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ३५२ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, औंढा नागनाथ पंचायत समितीत मंगळवारी सकाळी प्रकार घडला. "स्मशानभूमीचे काम थांबवा, अन्यथा विष प्राशन करीन," असे वक्तव्य विजय लेकुळे यांनी केला .विस्तार अधिकारी शेषराव आमले व विस्तार अधिकारी सय्यद जमीर यांना सदरील काम थांबवा असे सांगत होता. त्यानंतर जामगव्हाण येथे विस्तार अधिकारी शेषराव आमले गेले व त्यांनी होणारे काम थांबवले अशी माहिती पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी आमले यांनी दिली.
यावेळी पंचायत समितीमध्ये विष प्राशन करणाऱ्या युवकास पोलिसांनी पकडले. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, सपोनी आयुब शेख, जमादार बबन चव्हाण, सय्यद सईद , अमोल चव्हाण, जयदीप जाधव तात्काळ दाखल झाले. पंचायत समितीत येऊन त्यांनी विष प्राशन करणाऱ्या तरुणास पोलीस स्टेशनला नेले.
पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती असून, या दाव्याचीही पडताळणी पोलिस तपासातून होणार आहे. चौकशीची मागणी करणाऱ्या तक्रारदारालाच धमकी दिल्याचा आरोप आणि त्याचवेळी घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण प्रकरणाची औंढा नागनाथ तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.