शेतीविषयक धोरण बदलत असताना कृषी उत्पन्न बाजार समित्यांना टिकाव धरण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढविणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार – सभापती जालिंदर बुधवत
बुलढाणा : शासकीय निधीचा कुठलाही आधार नसताना स्वउत्पन्नाचे स्रोत वाढवून बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासामध्ये मोलाची कामगिरी बजावणारे सभापती जालिंदर बुधवत यांच्या आणखी एका सकारात्मक निर्णयाची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाजार समितीच्या चांडोळ उपबाजारासाठी पाच एकर शासकीय जागा मंजूर करण्यात आली असून या ठिकाणी उपबाजार सुरू करण्यात येणार आहे.
शेतकरी हितासाठी हे महत्त्वाचे पाऊल असून, विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल योग्य भावात विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याची प्रतिक्रिया सभापती जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केली.
शेतीविषयक धोरण बदलत असताना कृषी उत्पन्न बाजार समित्यांना टिकाव धरण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीला चांडोळ येथे उपबाजार सुरू करण्यासाठी शासनाकडून पाच एकर जागा मंजूर करण्यात आली आहे.
चांडोळ येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार सुरू व्हावा यासाठी सभापती जालिंदर बुधवत यांनी गेल्या सहा ते सात वर्षांपासून मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. या उपबाजारासाठी जागेची उपलब्धता ही मुख्य अडचण होती. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, चांडोळ येथील गट क्रमांक 659 मधील ई वर्गाची दोन हेक्टर आर. (सुमारे पाच एकर) शासकीय जमीन उपबाजारासाठी मंजूर करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या (क्रमांक जमीन 2017/प्र.क्र.254/जमीन-9 ई-1445757) आदेशानुसार ही जमीन नाममात्र एक रुपया दराने कृषी उत्पन्न बाजार समितीला मंजूर करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी रा.प्र.क्र. एल.एन.डी.-12/चांडोळ/59/2025-26 या आदेशान्वये ही जागा कृषी उत्पन्न बाजार समितीकडे हस्तांतरित केली आहे.
कधीकाळी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही आर्थिक अडचणीत असलेल्या बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत मोठे परिवर्तन घडले आहे. बाजार समितीला 'ड' वर्गातून 'अ' वर्गात आणण्यात यश आले. तसेच अंतर्गत सुविधा, प्रशासकीय इमारती, बुलढाणा, दुधा आणि धाड येथे शेतमाल साठवणुकीसाठी गोदामे, गाळे बांधकामातून कायमस्वरूपी उत्पन्नाचे स्रोत तसेच दुधा येथील पेट्रोल पंप या माध्यमातून बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
चांडोळ परिसरातील अनेक शेतकरी आजही आपला शेतमाल विक्रीसाठी मराठवाडा भागात घेऊन जातात. चांडोळ येथे उपबाजार सुरू झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि बाजार समितीच्या उत्पन्नातही वाढ होईल, हा उद्देश समोर ठेवून जालिंदर बुधवत यांनी सातत्याने प्रयत्न केले. जागेची अडचण दूर झाल्याने आता या उपबाजाराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास वाचणार आहे.
जागा हस्तांतरणाबाबतचा आदेश पारित झाल्यानंतर सभापती जालिंदर बुधवत यांनी सर्व संचालकांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
शेतमाल विक्रीदरम्यान खासगी व्यापाऱ्यांकडून होणारी लूट आणि फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी चांडोळ उपबाजार परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण संचालक मंडळ व प्रशासकीय सदस्यांचे सहकार्य लाभत असून, लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया सभापती जालिंदर बुधवत यांनी दिली.