NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलन देशभर पोहोचले; अनेक बॉलिवूड कलाकार विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मैदानात, सोशल मीडियावरही व्यक्त केला पाठिंबा
नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटत असून, विविध राज्यांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत आहेत. आंदोलनाला सामाजिक, सांस्कृतिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत त्यांनी त्यांच्या संघर्षाला पाठिंबा दर्शवतानाच संयम राखण्याचे आणि कोणत्याही बाह्य प्रभावापासून सावध राहण्याचे आवाहन केले.
व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी तुमच्या आंदोलनाची छायाचित्रे पाहून मला खूप वेदना झाल्या. कोणत्याही विद्यार्थ्याला स्वतःचा आवाज पोहोचवण्यासाठी अशा परिस्थितीत उभे राहावे लागू नये. मी स्वतःही विद्यार्थी राहिलो आहे. मीही अनेक प्रश्न विचारले आहेत आणि व्यवस्थेशी संघर्ष केला आहे. आज माझ्या संस्थेत शेकडो विद्यार्थी आहेत. त्यामुळे तुमची अस्वस्थता, संताप आणि अपेक्षा मला समजू शकतात."
विद्यार्थ्यांबद्दल बोलताना त्यांनी पुढे म्हटले की, "विद्यार्थी हा समाजाचा सर्वात प्रामाणिक आवाज असतो. त्यामागे कोणताही स्वार्थ नसतो, तर केवळ भविष्याबद्दलची चिंता आणि आपल्या हक्कांसाठीची मागणी असते. देश अधिक सक्षम आणि चांगला व्हावा, हेच त्यांचे स्वप्न असते. त्यामुळे मी मनापासून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा आहे."
तथापि, आंदोलनादरम्यान बाहेरील व्यक्ती किंवा राजकीय अजेंडा घेऊन येणाऱ्या घटकांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना इशाराही दिला. "जेव्हा बाहेरील लोक तुमच्या आंदोलनात प्रवेश करतात, तेव्हा सुरुवातीला त्यांचा सहभाग ताकद वाटू शकतो. पण अनेकदा तेच लोक आंदोलनाची दिशा बदलतात आणि विद्यार्थ्यांच्या मूळ उद्दिष्टांवर परिणाम करतात. त्यामुळे अशा घुसखोरीपासून सावध राहणे आवश्यक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कथित NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'ने सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अनेक शहरांमध्ये मोर्चे आणि निदर्शने होत असून, मुंबईतही विविध ठिकाणी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी साथ दिली आहे. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभागी होत त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर आणि सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.