Akhand Harinam Saptah: भानखेड्यात अखंड हरिनाम सप्ताह आणि ईदच्या संयोगाने हिंदू-मुस्लिम समुदायाने एकत्र येऊन सामाजिक सलोख्याची अनोखी दृष्टांत निर्माण केली.
अखंड हरिनाम सप्ताहात मुस्लिम बांधवांनी जोपासली सामाजिक सलोख्याची परंपरा
सेनगाव (Akhand Harinam Saptah) : टाळ-मृदंगाचा गजर, विठू नामाचा जयघोष आणि याच सोहळ्यात मुस्लिम बांधवांनी वाटलेला शिरखुरमा... असे भक्ती आणि सामाजिक सलोख्याचे अनोखे दर्शन सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथे घडले. निमित्त होते अखंड हरिनाम सप्ताह आणि रमजान ईद या दोन्ही सणांच्या एकत्र येण्याचे. शनिवारी (२१ मार्च) येथे हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत राष्ट्रीय एकात्मतेचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला. शिरखुरमा वाटून दिला एकतेचा संदेश
मागील दोन वर्षांप्रमाणे याही वर्षी सप्ताहाच्या (Akhand Harinam Saptah) कालावधीतच रमजान ईद आल्याने मुस्लिम बांधवांनी सप्ताहातील वारकरी आणि भाविकांना शिरखुरमा देऊन सणाचा आनंद द्विगुणित केला. केवळ धार्मिक विधी न मानता, एकमेकांच्या धर्माचा सन्मान करत मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांशी गळाभेट घेतली आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. मान्यवरांची उपस्थिती या हृदयस्पर्शी सोहळ्यासाठी ह.भ.प. भागवताचार्य नाना सूर्यवंशी महाराज, सेनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मस्के, ओम पाटील कोटकर, पोलीस पाटील शिवानंद कोटकर, केंद्रप्रमुख ओंकार कोटकर, परमेश्वर टिळक यांच्यासह गावातील मुस्लिम बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"भानखेडा गावाने दाखवून दिलेली ही एकता आजच्या काळाची गरज आहे. वारकरी संप्रदाय हा मुळातच माणुसकी शिकवतो आणि त्याचेच प्रतिबिंब आज इथे उमटले आहे."
-ओम कोटकर
या (Akhand Harinam Saptah) उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात भानखेडा गावाच्या एकतेचे आणि सामंजस्याचे कौतुक होत आहे.