जगात विज्ञानाने शोध घेता-घेता आकाशी चंद्रापर्यंत जाण्याची सफलता यशस्वी केली.
(Hari Bhakt) जगात विज्ञानाने शोध घेता-घेता आकाशी चंद्रापर्यंत जाण्याची सफलता यशस्वी केली. ही सर्वत्र अभिमानाची बाब झाली. विज्ञानाने घराघरात सुख सहकार्य केले. जगात विज्ञानाने शोध घेतला आणि आध्यात्मिकेने बोध केला. विज्ञान माणसाने निर्माण केले. विज्ञानाने माणूस नाही निर्माण केला? अर्थातच माणूसच ज्ञानी आहे. कल्पक आहे, हे कुणालाच नाकारता येणार नाही. विज्ञानाने भौतिक सुख- सहकार्य केले, पण आध्यात्मिकतेने आत्मिक शांती, समाधानी सद्गुणाची वाट दाखविली. म्हणून आज हिंदुस्थानातच नव्हे तर संपूर्ण जगात विज्ञान व धार्मिकतेचे स्वागत होत आहे.
जन्मलेल्या बाळाला आईबाप मुल समजदार होईपर्यंत; मग ते मुलगी असो वा मुलगा त्यांना धडे देतात. नंतर तिच मुलं-मुली आपापल्या सोयीने वाटचाल करतात. त्यात काही विवेकी तर काही अविवेकी विचाराने आपले जीवन साकारतात. अविवेक मार्गाने जाणाऱ्याला संत निळोबाराय एका अभंगात म्हणतात-
मार्ग दावूनी गेले आधी।
दया हा संतांचा खजिना आहे.
आता त्याच्या मार्गाचे अनुसरण करा
न पडे गुंता कोठे काही ।।२।।
मोडूनिया नाना मते ।
देती सिद्धांत सौरसु ।।३।।
निळा म्हणे ऐसे संत ।
कृपावंत सुख सिंधू ।।४।।
वाट चुकलेल्या लोकांनी योग्य वाटेने वाटचाल करावी, असा संत निळोबारायांनी आपल्या अभंगातून लोकांना उपदेश केला.
हिंदुस्थानच्या प्रत्येक जिल्ह्यातील संतांनी आडमार्गाने जाणाऱ्याला उपदेश केला, हे त्यांचे ग्रंथ ग्वाही देत आहेत. धार्मिकतेमध्ये आध्यात्मिकतेत जात धर्म याची दुही नाही. धर्माला जाती धार्मिकतेत भेदाभेद नाही. जगात सर्वांचा धर्म एकच आहे. जात एकच आहे. भलेही त्यांचे नावे वेगवेगळी असतील, पण क्रिया मात्र एकच आहे. सर्व नद्या शेवटी सागरालाच मिळतात. तसेच सर्वधर्माचे सार एकच आहे. ते म्हणजे 'जगात सर्वांचे भले व्हावे' समर्थ रामदास स्वामी म्हणतात.
दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची करितो ।।
ही संताची सद्भावना जनतेसाठी आहे आणि ते जन भल्याचेच कार्य करीत आहेत. कुमार्गाने कुणी जाऊ नये, ही संताची मनोकामना असते. आणि त्याच हेतूने संत कार्य करीत असतात. ठेच लागते व्यक्तीला पण त्याचे दुःख होते संताला. प्रत्येक प्राणी निरामय असला पाहिजे ही संताची मनोकामना असते. संत हे दीनवत्सल असतात. ते रंजल्या गांजल्याची सेवा करणे आपले अहोभाग्य समजतात. त्याच कारणाने भाविक संतांना परमेश्वर रूप समजतात. संत निळोबाराय म्हणतात-
काय त्यांचा महिमा वाणू वारंवार
हरिभक्त थोर भूमंडळी ।।
मानव जातीत तीन प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारचा अज्ञानातील अज्ञानी, दुसरा अज्ञानातून ज्ञानी आणि तिसरा मूर्तीमंत ज्ञानस्वरूप. पहिला प्रकारच्या माणसाला आपला जन्म कशासाठी झाला? आपण काय करावे? त्याला कळत नाही.
दुसरा आहे 'मुमुक्ष' सत्संगतीने त्याला आत्मा हाच आपला परमेश्वर आहे. तोच आपल्याला विवेक देतो आणि तिसरा आहे साधू. ते ज्ञान स्वरूपच आहेत. नव्हे आहेतच. जनकल्याण करणारे संत परमेश्वराच्याआधीन असतात. ते परमेश्वराचा आदेश पाळतात. माणसाच्या जीवनात काय आहे? तुमची ६-७ मजली इमारत आहे, पण त्यात 'देव घर नाही. तेथे 'भयाण' वाटते. समाधान वाटत नाही. ज्या घरात भजन नाही ते घर वैभवशाली वाटत नाही. मुलगी पाहायला रूपवान आहे, पण तिला नाकच नाही. असेच माणसाच्या जीवनात असते. मनुष्य धडधाकट आहे. मेहनती आहे, पण परमेश्वराचे नामस्मरण करीत नाही. त्याच्या जीवनात यश नाही. फुल खूप सुंदर आहे, पण त्याला सुगंध नाही. फुलाला त्या कुणी महत्त्व देत नाहीत.
योग्य उपयुक्त वस्तू कुणालाही हवी-हवीशी असते. फुलात रंग आहे पण सुगंध नाही. त्याचा स्वीकार कुणी करीत नाही. प्रत्येकाने आपल्या जीवनात काय उपयुक्त आहे. त्याचाच स्वीकार करावा. श्रीमदभागवत ग्रंथ सांगतो. माणसाचा विकास होण्यासाठी तीन मार्ग सांगितले. ते येणेप्रमाणे १ कर्मयोग २ ज्ञानयोग आणि ३ भक्तियोग. या मार्गाने प्रत्येकाने चाल केली तर माणसाचे जीवन 'स्वर्गमय' होईल. भक्तीमार्गाने चला. हे सर्वच संत सांगत आले.
मार्ग दावूनी गेले आधी दया निधी संतते
संत निळोबांनी माणसाने भक्ती मार्ग सोडू नये असे सांगितले. आत्म कल्याण इच्छिणाऱ्या साधकाने कोणत्या मार्गाने जावे हे निळोबा सांगतात.
तेणेचि पणते चलो
जात ना पडे गुंता कोठे कही ।।
छन्नी हातोड्याचा घाव सहन केल्यावरच पाषाणाची मूर्ती आकाराला येते. तसेच संतसुद्धा दुष्टांच्या अनेक यातना सहन करून ते भगवान भक्त झालेत. संत एकनाथ महाराजांची शांत वृत्ती., सत्कार्य करण्याची प्रवृत्ती, रंजल्या गांजल्याची सेवा आणि श्रीमंतीचा लोभ नगण्य समजून परोपकार करण्यास पुढे सरसावले. महाराजांचे हे सद्गुण पाहून श्रीखंड्या म्हणून पंढरीच्या विठोबाने एकनाथ महाराजांच्या घरी रांजणात पाणी भरले हे सर्वश्रुत आहे. म्हणून संताचे चरणी भाविक लीन होतात. तेच आपले जीवन सार्थक करू शकतात.
ह. मो. खटोड गुरुजी
(लेखक हे आध्यात्मिक तत्त्वज्ञान प्रचारक समितीचे केंद्रीय अध्यक्ष असून ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक आहेत.)
शिरसोली, ह. मु.अकोला
मो. नं.: ९५२७९०७००५