२२ सप्टेंबरला मुंबईत भाजपप्रवेश?
समाधान गाडेकर
चिखली (Rahul Bondre) : बुलढाणा जिल्ह्याची ‘राजकीय राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखली विधानसभा मतदारसंघातून एक अत्यंत महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे. चिखलीचे माजी आमदार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष आणि संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात दीर्घकाळापासून वजनदार नेतृत्व म्हणून ओळख असलेले राहुल बोंद्रे हे अखेर काँग्रेस पक्षाला 'जय महाराष्ट्र' करत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना पूर्णविराम देत, येत्या २२ सप्टेंबर २०२६ रोजी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात निश्चित मानले जात आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणाला एक नवी कलाटणी मिळणार आहे.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश
राजकीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांच्या भाजप प्रवेशाचा सोहळा राज्याची राजधानी मुंबई येथे पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रवेश होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, भाजपचे स्थानिक नेत्यांसह वरिष्ठ नेते व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुल बोंद्रे आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वात बैठकांचे सत्र सुरू होते. भविष्यातील राजकीय दिशा आणि इतर मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाची संपूर्ण रूपरेषा मुंबईत निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
समर्थकांना भावनिक व्हॉईस मेसेज व डिजिटल पत्र: 'नवी वाट... नवा अध्याय'
२० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सव्वा अकरा वाजेच्या सुमारास राहुल बोंद्रे यांनी चिखली मतदारसंघातील आपल्या हजारो समर्थकांच्या मोबाईलवर एक भावूक व्हॉईस मेसेज पाठवला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी डिजिटल पत्र सोशल मीडियावर शेअर करत नव्या प्रवासाचे स्पष्ट संकेत दिले.
व्हायरल झालेल्या पत्रकात राहुल बोंद्रे यांनी नमूद केले आहे:
"राजकारणाच्या माझ्या प्रवासात मला अनेक माणसं भेटली, अनेक अनुभव आले... पण काही माणसं अशी आहेत जी जात, धर्म, पक्ष किंवा परिस्थिती पाहून नाही, तर अत्यंत विश्वासाने व निस्वार्थपणे माझ्यासोबत उभी राहिली. तुम्ही त्यापैकीच एक आहात.
कदाचित प्रत्येक वेळी हे बोलून दाखवता आलं नसेल, पण माझ्या प्रत्येक चांगल्या-वाईट काळात अत्यंत विश्वासाने तुमची मोलाची साथ मला लाभली.
पुढे परिस्थिती कोणतीही असो, आपल्यातलं हे नातं आणि एकमेकांवरचा विश्वास कायम राहावा, एवढीच मनापासून इच्छा."
तसेच या पत्रावर "नवी वाट... नवा अध्याय... चिखलीच्या राजकारणात नवा विचार, नवी दिशा, नवा बदल" अशी ठळक आणि सूचक टॅगलाईन देण्यात आली आहे. या भावनिक आवाहनामुळे त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून नवी वाट (भाजप प्रवेश) धरल्याची चर्चा जोर धरत आहे.
आमसभेत सूचक विधान: 'नवीन कितीही आले तरी जुन्यांचा सन्मान राखला जाईल'
भावनिक संदेशाच्या पाठोपाठ राहुल बोंद्रे यांनी आपले कट्टर समर्थक दीपक देशमाने यांच्या मुंगसाजी महाराज सहकारी पतसंस्थाच्या वार्षिक आमसभेला मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावली.
या कार्यक्रमात मंचावर विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. माजी सभापती अशोक पडघान यांनी व्यासपीठावरील बदललेल्या समीकरणांवर भाष्य करताना म्हटले की, भाजपचे नगराध्यक्ष मामा पंडितराव देशमुख हे खूश दिसत आहेत, तर आमचे मामा काँग्रेसचे नेते माजी सभापती विष्णू पाटील कुलसुंदर, बाजार समिती सभापती समाधान सुपेकर, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेते डॉ. मोहम्मद इसरार नाराज दिसत आहेत. तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख श्रीराम धोरे यांनीही मंचावरील बदलत्या राजकीय परिस्थितीकडे लक्ष वेधले.
या विधानांचा धागा पकडत राहुल बोंद्रे यांनी मंचावरून अत्यंत सूचक राजकीय वक्तव्य केले:
"सध्या मंचावर आणि वातावरणात मोठा बदल होत असल्याचे दिसत आहे. पंडितराव दादा आणि इतर भाजपची तसेच वेगवेगळ्या विचारधारेची मंडळी आज इथे उपस्थित आहे. श्रीराम भाऊ, मी मुंगसाजी महाराज पतसंस्थेच्या वतीने आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की, मंचावर नवीन पक्षाची मंडळी दिसत असली तरी नवीन कितीही आले तरी जुन्या निष्ठावंत सहकाऱ्यांचा मान-सन्मान तेवढाच राखला जाईल. जुन्यांची साथ कधीच सुटणार नाही."
त्यांच्या या थेट विधानामुळे भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चेला मोठे बळ मिळाले आहे.
राजकारणाला नवीन वळण....
राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांनी यापूर्वी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली असून मतदारसंघात त्यांची भक्कम वैयक्तिक फळी आहे. : जिल्ह्यात जनाधार असलेला एक मोठा चेहरा काँग्रेसला गमवावा लागणार आहे.: चिखलीसह लगतच्या मतदारसंघांमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. मुंबईमध्ये होणाऱ्या या बहुचर्चित प्रवेश सोहळ्याकडे आता चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे.