समृद्धी महामार्ग भीषण अपघात

एमबीएसाठी जुळ्या मुलीला पुण्यात सोडले...परतीच्या प्रवासात काळाचा घाला!

Samruddhi Highway Accident: मृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आई-वडील, जुळ्या बहिणींपैकी जानवी, कारचालक तसेच आयशर ट्रकचा चालक व क्लिनर अशा सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

एमबीएसाठी जुळ्या मुलीला पुण्यात सोडले...परतीच्या प्रवासात काळाचा घाला!

Samruddhi Highway Accident


समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह सहा जणांचा जागीच मृत्यू

इथेनॉलचा टँकर पलटल्याने वाहतूक संथ; विरूळ आकाजीजवळ आयशरची सेंट्रोला भीषण धडक

विरूळ आकाजी/ वर्धा () : मुलगी एमबीए करून मोठी व्हावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी, या स्वप्नासाठी जुळ्या मुलींपैकी तन्वीला पुण्यातील वसतिगृहात सुरक्षितपणे सोडून आनंदाने घरी परतणाऱ्या सालोड (हिरापूर) येथील टिपले कुटुंबावर नियतीने काळाचा घाला घातला. समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्ह्यातील विरूळ आकाजीजवळ सोमवारी (२० जुलै) मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आई-वडील, जुळ्या बहिणींपैकी जानवी, कारचालक तसेच आयशर ट्रकचा चालक व क्लिनर अशा सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. घरापासून अवघे २५ किलोमीटर अंतर बाकी असतानाच घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला असून सालोड (हिरापूर) गावावर शोककळा पसरली आहे.

पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Samruddhi Highway Accident) छिंदवाडा येथून पुण्याकडे इथेनॉल घेऊन जाणारा टँकर विरूळ आकाजीजवळ समृद्धी महामार्गावर अनियंत्रित होऊन पलटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथेनॉल रस्त्यावर सांडल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक नियंत्रण सुरू केले होते. वाहने संथगतीने पुढे सरकत असतानाच मागून भरधाव आलेल्या यूपी-७१ सीटी-०६०२ क्रमांकाच्या मिरची भरलेल्या आयशर ट्रकने एमएच-३२ वाय-१४३९ क्रमांकाच्या सेंट्रो कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की सेंट्रो कार थेट आयशरच्या केबिनमध्ये घुसली आणि तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

या भीषण अपघातात सालोड (हिरापूर) येथील राजेश आनंदराव टिपले, त्यांची पत्नी सुषमा राजेश टिपले आणि मुलगी जानवी राजेश टिपले यांचा जागीच मृत्यू झाला. कारचालक अंकुश राऊत यांनाही जीव गमवावा लागला. तसेच आयशर ट्रकचा चालक संजय कुमार (रा. धनानीपूर, जि. फतेहपूर, उत्तर प्रदेश) आणि क्लिनर समरजीत पाल (रा. हरिमनपूर, उत्तर प्रदेश) यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला.

राजेश टिपले हे शेतीसोबत कपड्याचा व्यवसाय करत होते. ते मनमिळावू आणि सामाजिक स्वभावाचे होते. त्यांना तन्वी आणि जानवी या जुळ्या मुली होत्या. दोघींनी उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात मोठे व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी तन्वीला एमबीएच्या शिक्षणासाठी पुण्यातील वसतिगृहात दाखल करण्यासाठी संपूर्ण कुटुंब पुण्याला गेले होते. मुलीला सुरक्षितपणे होस्टेलवर सोडल्यानंतर आनंदाने ते परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र घरापासून अवघे २५ किलोमीटर अंतर बाकी असतानाच विरूळ आकाजीजवळ नियतीने त्यांच्यावर घाला घातला.
एका क्षणात आई-वडील आणि जुळ्या बहिणींपैकी जानवीचा मृत्यू झाला, तर शिक्षणासाठी पुण्यात राहिलेली तन्वी आयुष्यभरासाठी आई-वडील आणि आपल्या जुळ्या बहिणीला मुकली. एमबीएचे शिक्षण घेऊन आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुण्यात गेलेल्या तन्वीच्या आयुष्यात एका क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. तिच्या डोळ्यांसमोरचे भवितव्य कायमचे बदलून गेले.

सालोड (हिरापूर) येथील भाजपचे उपसरपंच आशिष कुचेवार यांनी सांगितले की, राजेश टिपले हे शेती आणि कपड्याच्या व्यवसायासोबत व्हॉलीबॉल क्षेत्रातही सक्रिय होते. 'न्यू स्टार' व्हॉलीबॉल समूहाचे ते सक्रिय सदस्य होते. विद्यापीठस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनाने गावाने एक हसतमुख, मदतीला धावून जाणारा आणि क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

कारचालक अंकुश राऊत यांच्या पश्चात पत्नी आणि अवघी एक वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या निधनामुळे राऊत कुटुंबावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Samruddhi Highway Accident) अपघात इतका भीषण होता की कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला हायड्रॉलिक कटरचा वापर करावा लागला. त्यानंतर सर्व मृतदेह पुलगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून समृद्धी महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता कारखेले, पुलगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदाशिव ढाकणे, महामार्ग पोलीस जामचे एपीआय सरिता यादव, पीएसआय भय्याजी तोडासे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य, वाहतूक नियंत्रण, पंचनामा आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्याचे काम करण्यात आले. या (Samruddhi Highway Accident) हृदयद्रावक दुर्घटनेने केवळ सहा जीव घेतले नाहीत, तर एका कुटुंबाची सर्व स्वप्नेही एका क्षणात उद्ध्वस्त केली. समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संबंधित सामग्री

कोटगूल आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून १० लाखांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी

कोटगूल आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करून १० लाखांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी

Ashram school Student Death: शासकीय आश्रमशाळा, कोटगूल येथील विद्यार्थिनी हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आश्रमशाळा प्रशासनावर कठोर कारवाई

Aug 04, 2026