पुणे (Pune Proton Therapy) : कर्करोगावरील अत्याधुनिक आणि प्रभावी उपचारपद्धती मानली जाणारी ‘प्रोटॉन थेरपी’ आता लवकरच पुण्यात उपलब्ध होणार आहे. शासन आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा सर्वसामान्य रुग्णांना परवडेल अशा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सध्या ही सुविधा राज्यात प्रामुख्याने मुंबईत उपलब्ध आहे.
गरजू रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार माफक दरात मिळावेत, यासाठी आरोग्य विभाग आणि रुबी हॉल क्लिनिकच्या प्रतिनिधींची मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला रुबी हॉल रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. सायमन ग्रँड, आरोग्य विभागाचे सहसचिव डॉ. मिलिंद कदम, वैद्यकीय सहायता कक्षाचे कौस्तुभ थोरात, प्रसाद बिराजदार आणि गणेश तिकोने उपस्थित होते. बैठकीत रुग्णांच्या हिताच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या (Pune Proton Therapy) निर्णयानुसार, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुबी हॉल क्लिनिकसारख्या अंगीकृत रुग्णालयांमध्ये हृदयरोग आणि कर्करोगावरील उपचार सर्वसामान्य रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
तसेच, अवयव प्रत्यारोपणासारख्या अत्यंत खर्चिक उपचारांसाठी शासकीय योजनेची आर्थिक मर्यादा अपुरी पडल्यास, उर्वरित खर्चासाठी ‘शासकीय कॉर्पस फंड’मधून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गरजू रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्यासोबतच अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या मोहिमेलाही चालना मिळणार आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा तसेच कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील ग्रामीण रुग्णांना महागड्या वैद्यकीय चाचण्यांसाठी पुणे किंवा मुंबईला जावे लागू नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉलच्या माध्यमातून अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात येणार आहे. या केंद्रात माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
खासगी रुग्णालये आणि शासकीय आरोग्य योजनांच्या समन्वयातून अशा (Pune Proton Therapy) प्रकारची केंद्रे उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या जवळच दर्जेदार आणि परवडणारे उपचार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.