ओलियम-सल्फरच्या रिअॅक्शनदरम्यान रिअॅक्टरचा स्फोट; दोन तासांत परिस्थिती नियंत्रणात, कामगारांच्या सुरक्षेवरून ग्रामस्थांचा संताप
रायगड जिल्ह्यातील महाड MIDC परिसरात सोमवारी सकाळी सिनर्जिया केमिकल कंपनीत झालेल्या जोरदार स्फोटामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. ओलियम आणि सल्फरची रिअॅक्शन सुरू असताना रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटाचा आवाज आणि हादरे कंपनीपासून तब्बल 4 ते 5 किलोमीटर अंतरापर्यंत जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटानंतर कंपनीच्या आवारातून आगीच्या मोठ्या ज्वाळा तसेच धुराचे लोट उठताना दिसून आले. या दुर्घटनेत चार कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Raigad, Maharashtra: A chemical accident occurred at Synergia Chemical Industries, Plot C-57, in the Mahad MIDC area while Para-Nitro Toluene Ortho-Sulfonic Acid was being produced. Four people were injured in the incident, while no fatalities have been reported. pic.twitter.com/w81mBBNYRi
— IANS (@ians_india) September 27, 2026
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, NDRF, पोलिस आणि महसूल विभागाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. स्फोटानंतर सुमारे दोन तासांत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती परिसरात पसरताच ग्रामस्थांनी कंपनीच्या बाहेर मोठी गर्दी केली. अपघाताच्या वेळी कंपनीत कार्यरत असलेल्या कामगारांची यादी जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या मागणीवरून पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मात्र प्रशासनाने घटनाक्रमाची माहिती देत कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेबाबत ग्रामस्थांना आश्वस्त केल्यानंतर परिस्थिती निवळली. स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा पुढील तपास प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
या घटनेनंतर महाड औद्योगिक वसाहतीतील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील काही वर्षांत महाड MIDC परिसरात वायूगळती तसेच स्फोटाच्या घटना घडल्याने औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे MIDC परिसरातील कंपन्यांमध्ये सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.