सोयगाव येथे अंत्यसंस्कार; गावावर शोककळा
बुलढाणा (Jawan Ambadas Wagh Martyrdom) : तालुक्यातील सोयगाव येथील जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना जवान अंबादास वाघ यांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वीरमरण आले. दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजता त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. जवान अंबादास पांडुरंग वाघ वय ४५ वर्ष यांच्या निधनाची बातमी सोयगाव येथे पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना जवानाचे निधन झाल्याने ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.
दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सोयगाव येथे आणण्यात आले.दुपारी १२:३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वीर जवान अंबादास वाघ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यावर सोयगाव येथे अंत्यविधी पार पडला.
जवान अंबादास वाघ (Jawan Ambadas Wagh Martyrdom) यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शासकीय इतमात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील, जम्मू काश्मीर चे शासकीय अधिकारी व धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजिनाथ मोरे व त्यांची सहकारी उपस्थित होते. तसेच परिसरातील राजकीय ,शैक्षणिक, अध्यात्मिक ,सामाजिक, कृषी, क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते. अमर रहे अमर रहे अंबादास वाघ अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. सोयगावने देशसेवेसाठी समर्पित एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला आहे.