उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
हिंगोली (Hingoli firecracker godown accident) : हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला आहे. या दुर्घटनेत पंधरा जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की,
"हिंगोलीमध्ये फटाका गोदामाला आग (Hingoli firecracker godown) लागून तीन लोक मृत्युमुखी पडले, पंधरा लोक जखमी आहेत. यामधील त्या तिन्ही परिवाराला सरकार तर मदत करेलच, पण शिवसेनेच्या वतीने देखील प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतलेला आहे."
शिंदे यांच्या या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीव्यतिरिक्त शिवसेना पक्ष म्हणून आम्ही त्या कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोष बांगर, परभणीचे खासदार बंडू पाटील परभणी हिंगोली विधान परिषदेचे आमदार सईद खान, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांची उपस्थिती होती.