टेस्ट ट्यूब फुटल्याने संसर्ग झाल्याचा संशय; रशियन अधिकाऱ्यांकडून मात्र प्लेगची अधिकृत पुष्टी नाही
कोरोना महामारीनंतर संसर्गजन्य आजारांबाबत जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढवणारी घटना रशियातून समोर आली आहे. सिबेरियातील इर्कुत्स्कजवळ असलेल्या एका संशोधन संस्थेत काम करणाऱ्या २७ वर्षीय महिला प्रयोगशाळा कर्मचाऱ्याचा गंभीर न्यूमोनियामुळे मृत्यू झाला. या महिलेचा मृत्यू संशयित न्यूमोनिक प्लेगच्या संसर्गामुळे झाल्याची चर्चा असून, प्रयोगशाळेत नमुने हाताळताना जिवंत जिवाणू असलेली टेस्ट ट्यूब फुटल्याने तिला संसर्ग झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेनंतर रशियन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसर सील केला आहे. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या सुमारे २०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. न्यूमोनिक प्लेग हा श्वसनाशी संबंधित गंभीर संसर्ग असून तो हवेतून किंवा श्वसनातील कणांमधून पसरू शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेची माहिती रशियन सरकारी वृत्तसंस्था TASS तसेच CNN यांनी दिली आहे.
ही घटना इर्कुत्स्कजवळील शेलेखोव्ह येथील इर्कुत्स्क प्लेग विरोधी संशोधन संस्थेत घडली. 'द मॉस्को टाइम्स'च्या वृत्तानुसार, २७ वर्षीय महिला प्रयोगशाळा कर्मचाऱ्याला मंगळवारी गंभीर न्यूमोनियाची लक्षणे दिसू लागल्यानंतर शेलेखोव्हमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले; मात्र गुरुवारी तिचा मृत्यू झाला.
BREAKING: 5 hospitals have been closed for quarantines in Siberia due to a possible plague outbreak. The 28-year-old lab technician Darya Shipilova, died yesterday after breaking a test tube with live Yersinia pestis the Irkutsk Anti-Plague Institute on September 25th while handling samples. A mask mandate has now been introduced at the huge aluminum plant in Irkutsk. Some U.S. politicians are now calling for commercial air travel to and from Russia to be stopped until the situation is clarified. This first symptoms of pneumonic plague typically start about 4 to 7 days after exposure. 200 people are under observation.
— Visegrád 24 (@visegrad24) October 4, 2026
दरम्यान, प्रयोगशाळेत चाचणीसाठी नमुने गोळा करताना जिवंत जिवाणू असलेली टेस्ट ट्यूब तिच्याकडून चुकून फुटली असण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर तिच्या संसर्गाचे कारण न्यूमोनिक प्लेग असावे का, याची चर्चा सुरू झाली आहे.
'न्यूमोनिक प्लेग'ची अधिकृत पुष्टी झाली आहे का?
रशियन प्रशासनाने अद्याप संबंधित महिलेचा मृत्यू न्यूमोनिक प्लेगमुळे झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. रशियन आरोग्य यंत्रणा या प्रकरणाचे वर्णन 'अज्ञात कारणांमुळे झालेला गंभीर न्यूमोनिया' आणि 'अत्यंत धोकादायक संसर्ग' अशा स्वरूपात करत आहे.
आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मात्र या घटनेकडे संशयित न्यूमोनिक प्लेग म्हणून पाहिले आहे. रोस्पोट्रेबनाडझोरचे माजी प्रमुख गेनाडी ओनिशचेन्को यांनी हा संसर्ग प्लेग नसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जरी तपासणीत प्लेगची पुष्टी झाली तरी हा आजार मोठ्या प्रमाणावर सर्वत्र पसरण्याचा धोका नसल्याचे मानले जाते.
न्यूमोनिक प्लेग म्हणजे काय?
न्यूमोनिक प्लेग हा 'येरसिनिया पेस्टिस' (Yersinia pestis) या जिवाणूमुळे होणारा प्लेगचा गंभीर प्रकार आहे. प्लेगचे तीन प्रमुख प्रकार मानले जातात. त्यापैकी ब्युबोनिक प्लेग प्रामुख्याने पिसवा किंवा संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून होतो. त्याच्या तुलनेत न्यूमोनिक प्लेग थेट फुफ्फुसांवर परिणाम करतो.
संक्रमित व्यक्तीला खोकला किंवा शिंक आल्यास श्वसनातून बाहेर पडणाऱ्या कणांद्वारे हा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या प्रकारच्या संसर्गामध्ये वेगाने खबरदारी घेणे महत्त्वाचे मानले जाते.
न्यूमोनिक प्लेगची प्रमुख लक्षणे कोणती?
अहवालांनुसार आणि यूएस CDCच्या माहितीनुसार, न्यूमोनिक प्लेगमध्ये सुरुवातीला तीव्र ताप, डोकेदुखी आणि अचानक जाणवणारी अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
संसर्ग गंभीर झाल्यास न्यूमोनिया झपाट्याने वाढू शकतो. त्यासोबत श्वास घेण्यास मोठा त्रास, छातीत तीव्र वेदना, सतत खोकला आणि खोकताना रक्त किंवा पांढरा पाणीदार कफ येणे अशी गंभीर लक्षणेही दिसू शकतात.