बल्लारपुर माता-नवजात बालक मृत्यू

बल्लारपुरात प्रसूतीदरम्यान माता व नवजात बालकाचा मृत्यू

Ballarpur Materna-Neonatal Deaths: एका नामांकित रुग्णालयात आज प्रसूतीदरम्यान माता आणि तिच्या नवजात बालकाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बल्लारपुरात प्रसूतीदरम्यान माता व नवजात बालकाचा मृत्यू

Ballarpur Materna-Neonatal Deaths

 

रुग्णालयात तणाव, ठाणेदारांच्या मध्यस्थीने वातावरण शांत

चंद्रपूर/ बल्लारपूर (Ballarpur Materna-Neonatal Deaths) : येथील एका नामांकित रुग्णालयात आज प्रसूतीदरम्यान माता आणि तिच्या नवजात बालकाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ठाणेदार विपिन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. 
    
मृत महिलेचे पती रणधीर कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून बल्लारशाह पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची  नोंद केली आहे. मृतदेह बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयामार्फत चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी  पाठवण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनचा अहवाल आल्यानंतर त्यानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. प्राप्त माहितीनुसार, मृतकाचे पती रणधीर कुमार सिंह हे मध्य रेल्वेच्या बल्लारशाह येथे लोको पायलट म्हणून कार्यरत आहेत.

त्यांची पत्नी नीलम कुमारी सिंह (३४) गरोदर असताना तिच्यावर संबंधित रुग्णालयात नियमित उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना २२ सप्टेंबरच्या दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २३ सप्टेंबरच्या पहाटे चार वाजेच्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर प्रसूतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नैसर्गिक प्रसूती  झाल्यानंतर सुमारे एका तासाने बाळाचा आणि त्यानंतर काही वेळातच माता नीलम कुमारी यांचा मृत्यू झाला.

डॉक्टरांचे स्पष्टीकरण:
संबंधित डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळली गेल्यामुळे त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळाला नाही, ज्यामुळे बाळाचा मृत्यू झाला; तर त्यानंतर रक्तदाब अत्यंत कमी झाल्यामुळे आईचाही मृत्यू झाला. परिस्थिती गंभीर होताच तातडीने चंद्रपूरवरून दोन तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते, परंतु तेदेखील त्यांना वाचवू शकले नाहीत. रुग्णालयाच्या वतीने उपचारात कोणतीही निष्काळजीपणा करण्यात आलेला नाही, ही बाब शवविच्छेदन अहवालातून आपोआपच स्पष्ट होईल, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.