Uttar Pradesh Rain

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

उत्तर प्रदेशात अतिवृष्टीमुळे 56 मृत्यू, 1,020 घरांचे नुकसान; ओडिशात महानदीला पूराचा धोका, ऋषिकेश राफ्टिंग बंद.

उत्तर प्रदेशात पावसाचा कहर; 56 जणांचा मृत्यू, 46 जखमी, 1,020 हून अधिक घरांचे नुकसान

Uttar Pradesh Rain

48 तासांत सरासरीपेक्षा 20 पटहून अधिक पाऊस; ओडिशात महापुराची शक्यता, ऋषिकेशमधील रिव्हर राफ्टिंग अनिश्चित काळासाठी बंद

नवी दिल्ली : देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तर प्रदेश, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये प्रशासन सतर्क झाले आहे. उत्तर प्रदेशात 25 सप्टेंबरच्या सकाळपासून 27 सप्टेंबरपर्यंतच्या 48 तासांत पाऊस आणि वादळाशी संबंधित घटनांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 46 जण जखमी झाले आहेत. या कालावधीत राज्यात 97.6 मिमी पावसाची नोंद झाली. राज्यातील या कालावधीतील एकत्रित सरासरी पर्जन्यमान 4.5 मिमी इतके असल्याने यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिक ठरला आहे.

उत्तर प्रदेशचे मदत आयुक्त हृषीकेश भास्कर यशोद यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे 1,020 हून अधिक घरांचे नुकसान झाले असून 107 जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील 75 पैकी 56 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विविध जिल्ह्यांकडून अद्याप संकलित केली जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या 48 तासांच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील अनेक भागांत हवामान आता काहीसे निवळले आहे. मात्र, तराई पट्ट्यात अद्याप मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

काही जिल्ह्यांत विक्रमी पावसाची नोंद

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये नेहमीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यंत मोठ्या फरकाने वाढले. फर्रुखाबादमध्ये सामान्य पर्जन्यमानापेक्षा तब्बल 7,385 टक्के अधिक पाऊस झाला. कन्नौजमध्ये हे प्रमाण 5,664 टक्के अधिक राहिले.

शाहजहांपूरमध्ये सामान्यपेक्षा 4,408 टक्के जास्त पाऊस झाला. त्यानंतर हमीरपूरमध्ये 4,240 टक्के, तर महोबामध्ये 4,100 टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली.

ओडिशात महानदीच्या पाणीपातळीकडे लक्ष

दरम्यान, ओडिशातही महानदी नदी प्रणालीतील पाण्याची पातळी वाढत असल्याने सखल भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महानदीच्या पाण्याच्या प्रवाहावर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, रविवारी रात्रीपर्यंत मुंडली येथे सुमारे 7 लाख क्युसेक पाण्याचा प्रवाह होऊ शकतो. सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत हा प्रवाह 8 लाख क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

या वाढत्या पाण्याचा परिणाम खुर्दा, कटक, पुरी आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांतील सखल भागांवर होण्याची शक्यता आहे. महानदीशी जोडलेल्या लूना, करांडिया, चित्रोत्पला, काठजोड़ी आणि कुआखाई या नद्यांमध्येही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय देवी, कंडाला, कुषभद्रा, दया, भार्गवी, राजुआ आणि मकरा या नद्यांवरही प्रशासनाचे लक्ष आहे.

उत्तर ओडिशातील परिस्थिती आधीच गंभीर होत असून बैतरणी, सालंदी आणि सुवर्णरेखा या नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा वरून वाहत आहेत.

ऋषिकेशमधील गंगा रिव्हर राफ्टिंगला ब्रेक

उत्तराखंडमध्येही सातत्याने सुरू असलेल्या पावसाचा परिणाम पर्यटनावर झाला आहे. ऋषिकेशमधील लोकप्रिय साहसी उपक्रम असलेले गंगा नदीवरील रिव्हर राफ्टिंग तूर्तास अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.

मुनी-की-रेती परिसरातील राफ्टिंग हवामान सुधारल्यानंतर आणि नदीची पाणीपातळी सुरक्षित पातळीवर आल्यानंतरच पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. टिहरी गढवाल जिल्ह्याचे पर्यटन आणि साहस अधिकारी सोबत सिंह राणा यांनी गढवाल विभागात सुरू असलेला पाऊस आणि हवामान विभागाच्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

राफ्टिंगला पुन्हा परवानगी देण्यापूर्वी हवामानाची स्थिती, मान्सूनचा अंदाज, गंगेची पाणीपातळी आणि आगामी आठवड्याचा हवामान अंदाज यासह विविध बाबींचे मूल्यांकन केले जाणार आहे.

देशाच्या विविध भागांत पावसाचा जोर कायम असल्याने उत्तर प्रदेश आणि ओडिशातील संभाव्य पूरस्थितीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित आहे. तर उत्तराखंडमध्ये नागरिकांच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रिव्हर राफ्टिंगला तात्पुरता ब्रेक देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर; पुणे, सातारा, कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट

राज्यात पुन्हा पावसाचा जोर. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड आणि धाराशिवमध्ये पावसाचा इशारा.

Sep 28, 2026
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर; भामरागडला पुराच्या पाण्याचा वेढा

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला. भामरागड शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले.

Sep 26, 2026
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; विदर्भात २३ सप्टेंबरपासून पावसाची शक्यता; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे २३ सप्टेंबरपासून विदर्भात पावसाची शक्यता. २४-२५ सप्टेंबरला चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.

Sep 21, 2026
मान्सूनची परतीची वाटचाल सुरू; महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम

मान्सूनची परतीची वाटचाल सुरू; महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम

मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. 21 आणि 22 सप्टेंबरला अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Sep 21, 2026