हजारो चुकीच्या चलानांचा पर्दाफाश
भुवनेश्वर (Traffic System E-Challan) : दुचाकीस्वाराला सीटबेल्ट न लावल्याबद्दल, तर कारचालकाला हेल्मेट न घातल्याबद्दल दंड ठोठावल्याचा अजब प्रकार ओडिशात समोर आला आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांच्या (कॅग) अहवालातून राज्यातील वाहतूक विभागाच्या ई-चलान यंत्रणेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. 2019 ते 2024 या कालावधीतील वाहन नोंदणी आणि ई-चलानच्या माहितीची तपासणी करताना हे प्रकार आढळून आले.
कॅगच्या तपासणीनुसार, 2,988 दुचाकींवर सीटबेल्ट न लावल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यापोटी तब्बल 29.88 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. त्याचप्रमाणे 4,786 तीन आणि चारचाकी वाहनांवर हेल्मेट न घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणांत एकूण 47.86 लाख रुपयांचा दंड लावण्यात आला. प्रत्यक्षात वाहनांच्या प्रकारानुसार हे गुन्हे लागू होणे शक्य नसतानाही चलान जारी करण्यात आल्याचे कॅगने निदर्शनास आणले आहे. त्यामुळे (Traffic System E-Challan) ई-चलान यंत्रणेत वाहनाचा प्रकार आणि संबंधित वाहतूक नियम यांची योग्य पडताळणी होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहन आणि गुन्ह्याचा मेळच नाही
वाहतूक गुन्हे नोंदविताना वाहनाचा प्रकार आणि संबंधित नियम यांची योग्य पडताळणी न झाल्याने चुकीची चलाने जारी झाल्याचे कॅगने नमूद केले आहे. ‘वाहन’ आणि ‘गुन्हा’ यांचा मेळ न घालता चलान जारी होणे हे यंत्रणेतील नियंत्रण आणि पडताळणीच्या अभावाचे निदर्शक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
चुकीची चलाने रद्द करण्याची शिफारस
कॅगने चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आलेली चलाने रद्द करण्याची तसेच अशा प्रकारच्या चुका होण्यास जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची शिफारस केली आहे. या प्रकरणामुळे वाहतूक विभागाच्या (Traffic System E-Challan) ई-चलान यंत्रणेतील डेटा पडताळणी आणि नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.