Raipur Accident

रायपुरात प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना; धावत्या कारच्या बोनेटवरून पडून 34 वर्षीय उद्योगपतीचा मृत्यू

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये प्रेमसंबंधातून झालेल्या वादाला धक्कादायक वळण मिळाले.

रायपुरात प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना; धावत्या कारच्या बोनेटवरून पडून 34 वर्षीय उद्योगपतीचा मृत्यू

Raipur Accident

प्रेयसीला मित्रासोबत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; भरत मंगनानीचा पोलिसांकडून शोध सुरू

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये प्रेमसंबंधातून झालेल्या वादाला धक्कादायक वळण मिळाले. प्रेयसीला तिच्या मित्रासोबत जाण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात 34 वर्षीय उद्योगपती परमप्रीत सिंग यांचा मृत्यू झाला. रायपूरमधील एम्सजवळ ही घटना घडली. धावत्या कारच्या बोनेटवरून खाली पडल्याने परमप्रीत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, परमप्रीत सिंग आणि संबंधित महिला गेल्या तीन ते चार वर्षांपासून एकमेकांच्या परिचयात होते. त्यांच्या विवाहाबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चाही झाली होती. मात्र, एम्सजवळ परमप्रीत यांनी आपल्या प्रेयसीला तिचा मित्र भरत मंगनानी याच्यासोबत पाहिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

वाद सुरू असताना संबंधित महिला भरतसोबत त्याच्या कारमधून तेथून निघण्याचा प्रयत्न करत होती. परमप्रीत यांनी त्यांना अडवण्यासाठी आपली कार भरतच्या कारसमोर घातली. त्यानंतर गाडी थांबल्यानंतर ते भरतच्या कारच्या बोनेटवर चढले आणि महिलेला कारमधून बाहेर येण्यास सांगितले.

मात्र, परमप्रीत बोनेटवर असतानाही भरतने कार पुढे नेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अंदाजानुसार, परमप्रीत रस्त्यावर कोसळण्यापूर्वी कार सुमारे 200 मीटरपर्यंत पुढे गेली असावी. त्यानंतर ते रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. अमनका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी परमप्रीत यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी सध्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासोबतच प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवले जात आहेत.

या प्रकरणातील भरत मंगनानी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. नेमक्या परिस्थितीत परमप्रीत कारच्या बोनेटवर कसे आले आणि त्यानंतर घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती सीसीटीव्ही फुटेज व साक्षीदारांच्या जबाबातून स्पष्ट करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

संबंधित सामग्री

घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह प्रशासनाने रोखला

घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह प्रशासनाने रोखला

महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत चाईल्ड हेल्पलाईन बुलढाणा, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच रायपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत घाटनांद्रा येथे होणारा बालविवाह रोखण्यातप्रशासनाला यश आले आहे.

May 23, 2026