सर्वोच्च न्यायालयाबाहेरील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण; शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी राऊतांवर केले गंभीर दावे
शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या अधिकारासंदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापलं आहे. सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आमनेसामने आले. यावेळी राऊतांनी म्हस्केंकडे पाहून केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर जोरदार टीका केली.
सर्वोच्च न्यायालयाबाहेरील कॅमेऱ्यांसमोर संजय राऊत यांनी नरेश म्हस्केंकडे पाहून ‘घेऊन ये त्याला’ असे म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. त्यानंतर म्हस्के तेथून निघून गेले. त्यावेळी राऊतांनी ‘अरे ये ना, यावच लागणार आहे ना’ असे म्हटल्याचेही समोर आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
‘संजय राऊत फेकूचंद, प्रत्येकवेळी उत्तर देतो’
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर थेट निशाणा साधला. राऊत हे ‘फेकूचंद’ असल्याची टीका करत आपण त्यांच्या वक्तव्यांना प्रत्येकवेळी उत्तर देत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. राऊतांसाठी ‘भोंगा’ यांसारखे शब्द आपणच वापरात आणल्यामुळे त्यांचा आपल्यावर राग असू शकतो, असा दावा त्यांनी केला.
म्हस्के यांनी पुढे राऊतांच्या राज्यसभा उमेदवारीच्या काळातील कथित नाराजीचाही उल्लेख केला. राज्यसभेचे तिकीट जाहीर होण्यास विलंब होत असताना राऊतांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल कथितरित्या अपशब्द वापरल्याचा दावा त्यांनी केला. तिकीट जाहीर करण्यास उशीर झाल्यामुळेच राऊत अशी वक्तव्ये करत असल्याचे म्हस्के म्हणाले.
‘मुख्यमंत्रीपदासाठी माझं नाव घ्या, कोण सांगत होतं?’
नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या काळातील काही घटनांबाबतही गंभीर दावे केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यात आले, मात्र त्यांच्या स्वतःच्या भावाला मंत्रिपद देण्यात आले नाही, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नसल्याने शिवसेनेच्या आमदारांची पवई येथील हॉटेलमध्ये बैठक घेण्यास कोणी सांगितले, तसेच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून विरोध करून स्वतःचे नाव पुढे करण्यास कोण सांगत होते, असा सवाल म्हस्के यांनी केला. या सर्व बाबी शिवसेनेतील लोकांना माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.
‘एकनाथ शिंदेंसोबत जाणारा पहिला जिल्हाप्रमुख मी’
आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे पहिले जिल्हाप्रमुख असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आपल्याला फोन आला होता, असा दावा त्यांनी केला.
त्या वेळी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांना स्पष्टपणे सांगितले होते, तसेच भेटण्यासाठी येणार नसल्याचेही कळवले होते, असे म्हस्के म्हणाले. त्यानंतर आपल्याला ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावण्यात आले असतानाही आपण एकनाथ शिंदे यांना बोलवावे आणि गैरसमज दूर करून अन्याय करू नये, अशी भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषद तिकिटावरूनही राऊतांना सवाल
नरेश म्हस्के यांनी विधान परिषद निवडणुकीतील तिकिटाच्या मुद्द्यावरूनही संजय राऊतांना आव्हान दिले. अयोध्या दौऱ्याचा संदर्भ देत, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपण विधान परिषदेसाठी आपले नाव असल्याचे सांगितले होते, असा दावा त्यांनी केला.
मात्र, आपल्याऐवजी अमशा पडवी यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले, असे म्हस्के यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी ‘नरेश म्हस्केंना तिकीट दिल्यास ते एकनाथ शिंदेंसोबत जातील’, असे म्हटल्याचे राऊतांनीच आपल्याला सांगितले होते, असा गंभीर दावा त्यांनी केला.
‘एकतर तुम्ही राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो’
संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नरेश म्हस्के यांनी थेट आव्हान दिले. बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर मानत असाल, तर नरेश म्हस्के यांचे एक तरी पत्र आपल्याकडे असल्यास ते सार्वजनिक करावे, असे त्यांनी म्हटले.
तसेच, ‘एकतर तुम्ही राजीनामा द्या किंवा मी राजीनामा देतो’, असे आव्हानही म्हस्के यांनी राऊतांना दिले. आपण राऊतांचा वरिष्ठ नेते म्हणून आदर करत असल्याचे सांगत काही गोष्टी उघड न केलेल्याच बऱ्या, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर संजय राऊत आपल्याला सातत्याने फोन करत होते, त्यावेळी नेमकं काय बोलले होते हे राऊतांनी जाहीर करावे, अशी मागणी म्हस्के यांनी केली. आपल्यावर कितीही टीका झाली तरी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत असून यापुढेही त्यांच्यासोबतच राहणार असल्याचे नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.