राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली.
नवी दिल्ली (Malviya Nagar Fire) : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरात बुधवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. लेमन ग्रीन नावाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे 9.45 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा (DFS) आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी इमारतीत अडकलेल्या 37 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र, आगीच्या तडाख्यात 21 जणांचा मृत्यू झाला. जखमींवर जवळील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
डीडीएमए (DDMA) दक्षिण जिल्ह्याचे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, “घटनेची माहिती मिळताच सर्व संबंधित यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या. प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या तळमजल्यावरील हॉटेलमधून आग लागल्याची शक्यता असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या
आग वेगाने पसरल्याने इमारतीतील बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे अनेक जण वरच्या मजल्यांवर अडकून पडले. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत इमारतीसमोर गाद्या टाकल्या. त्यानंतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनी, खिडक्या आणि वरच्या मजल्यांवरून खाली उड्या मारल्या. या धाडसी प्रयत्नांमुळे काही जणांचे प्राण वाचले.
प्रशासन सतर्क; तपासाचे आदेश
या घटनेनंतर निवासी भागांमध्ये सुरू असलेल्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या परवान्यांची माहिती महानगरपालिका प्रशासनाने मागवली आहे. तसेच अशा सर्व आस्थापनांची सुरक्षा तपासणी आणि अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. तसेच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.