फिक्की-कॅस्केडच्या अहवाल; देशातील एकूण कीटकनाशक बाजारपेठेच्या जवळपास 25 टक्के वाटा
मुंबई/ वर्धा (Counterfeit pesticide market) : देशातील कृषी क्षेत्रात बनावट कीटकनाशकांचा बाजार मोठ्या प्रमाणात विस्तारत असून, या बनावट उत्पादनांची उलाढाल तब्बल 11 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. फिक्की-कॅस्केड आणि केपीएमजी इंडियाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. देशातील कीटकनाशकांच्या एकूण बाजारपेठेची उलाढाल सुमारे 45 हजार कोटी रुपये असून, त्यातील जवळपास 25 टक्के हिस्सा बनावट कीटकनाशकांचा असल्याचे अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, नोंदणी नसलेली उत्पादने तसेच ‘बायो’ किंवा ‘नॅचरल’ या नावाखाली विकली जाणारी (Counterfeit pesticide market) बनावट जैविक कीटकनाशकेही मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. अशा उत्पादनांची बाजारपेठ सुमारे 8 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जैविक कीटकनाशकांच्या नावाखाली फसवणूक
क्रॉप केअर फेडरेशन ऑफ इंडिया (सीसीएफआय) ने मार्च 2026 मध्ये कृषी मंत्रालयाला सादर केलेल्या अहवालानुसार, देशातील नोंदणीकृत जैविक कीटकनाशकांची बाजारपेठ सुमारे 1 हजार कोटी रुपयांची आहे. मात्र, बनावट जैविक कीटकनाशकांमुळे या बाजारपेठेचा आकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘बायो’ किंवा ‘नॅचरल’ अशी लेबले लावून काही उत्पादने शेतकऱ्यांना विकली जात असल्याचे सीसीएफआयने निदर्शनास आणले आहे. अशा उत्पादनांची गुणवत्ता आणि परिणामकारकता शेतकऱ्यांना खरेदीच्या वेळी सहज तपासता येत नाही. फवारणीनंतरच त्याचा परिणाम लक्षात येतो. त्यामुळे बनावट उत्पादनांच्या विक्रेत्यांना त्याचा फायदा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जास्त कमिशनमुळे बनावट उत्पादनांना बाजारपेठ
बनावट कीटकनाशकांच्या विक्रीत विक्रेत्यांना 30 ते 35 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे काही विक्रेते अधिक नफा मिळविण्यासाठी अशा उत्पादनांना प्राधान्य देतात. आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना उधारीवरही ही उत्पादने दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. (Counterfeit pesticide market) बनावट कीटकनाशकांचा वापर केल्यानंतर पिकांवरील किडींचे नियंत्रण अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यानंतर किडींची प्रतिकारशक्ती वाढल्याचे कारण देऊन विक्रेते जबाबदारी झटकत असल्याचेही अहवालात नमूद आहे.
उत्पादनात 3 ते 4 टक्के घट
बनावट कीटकनाशकांच्या वापरामुळे देशातील कृषी उत्पादनात 3 ते 4 टक्क्यांची घट होण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे बनावट कीटकनाशकांचा प्रश्न केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीपुरता मर्यादित नसून, त्याचा थेट परिणाम कृषी उत्पादनावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो. सप्टेंबरमध्ये हा अहवाल सादर करण्यात आला होता. त्याला उशिराने सार्वजनिक करण्यात आले. तसेच लोकसभेत 2024 मध्ये देण्यात आलेल्या माहितीलाही या अहवालात संदर्भ देण्यात आला आहे. बनावट कीटकनाशकांच्या वाढत्या बाजाराला आळा घालण्यासाठी उत्पादनापासून विक्रीपर्यंत कठोर तपासणी आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणेची गरज निर्माण झाली आहे.