(Cultural Shift) संत ज्ञानेश्वरांनी 'हे विश्वची माझे घर' हे सुभाषित आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातून उद्धृत केले आहे. म्हणजे हे संपूर्ण विश्व म्हणजे माझे घर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. संपूर्ण जग माझ्यासाठी घरासारखे आहे. आणि कुटुंबात विश्वाला सामावून घेण्याची ताकद आहे. ते एका अर्थी खरेही आहे. प्रसिध्द समाजशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी कुटुंबसंस्थेवर प्रकाश टाकला आहे. त्यातही त्यांनी संयुक्त कुटुंबावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मते, संयुक्त कुटुंब म्हणजे तीन किंवा अधिक पिढ्या एकत्र राहतात. एकाच घरात एकत्र जेवतात आणि समान मालमत्ता वापरतात. म्हणजे कुटुंब व त्यातही संयुक्त कुटुंबात सगळ्या लोकांना सामावून घेण्याची किती ताकद आहे, हे त्यांच्या संयुक्त कुटुंबातील (Cultural Shift) विवेचनावरून लक्षात येते, व हे खरेही आहे. म्हणजेच कुटुंब तेवढी व्यापक होती. संयुक्त कुटुंबात अंध, अपंग, विधवा, परित्यक्ता, सख्खे, चुलत सर्व नातेवाईकांना सामावून घेतले जात होते; परंतु आता हे चित्र धुसर झाले आहे.
एकूण कुटुंबाच्या या बदलाकडे बघितले, तर १९९० नंतर वैश्विकरणाचे वारे वाहू लागले. वैश्विकरणाने संपूर्ण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवन ढवळून निघाले. संयुक्त कुटुंबाचा इमला तेव्हापासूनच कोसळायला सुरुवात झाली, असे म्हणायला हरकत नाही. कारण व्यक्तिवाद व विभक्त कुटुंबाला (Cultural Shift) त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. यासोबतच समलिंगी विवाह, लिव्ह इन रिलेशनशिप, वय वाढल्यामुळे विवाह न करणे यामुळे कुटुंबाची रचना, स्वरूप बदलत आहे, यासोबतच कुटुंबात नवे प्रश्नदेखील निर्माण होत आहेत.
माहिती, तंत्रज्ञान घरोघरी पोहोचले. मोबाईलमध्ये वेगळेवेगळे अँप्स आले. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअप यामुळे जग जवळ आलंय, हे खरं परंतु नात्यामधला ओलावा टिकून आहे का? या प्रश्नांची उत्तरेदेखील शोधण्याची गरज आहे. माहिती- तंत्रज्ञानाचा प्रभाव कुटुंब, समाजव्यवस्थेवर सकारात्मक होण्याऐवजी नकारात्मक झाला, की काय? असं वाटायला लागतंय! आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आल्यामुळे व्यक्ती मोबाईल मधल्या विविध अप्लिकेशन्सचा वापर करतोय. अनेक चांगल्या- वाईट गोष्टी त्यात बघतोय. त्यातूनदेखील त्याची जडणघडण होते. लहान मुलांचे सामाजिकीकरण मोबाईलच्या माध्यमातून होतेय की, काय असे वाटायला लागले आहे. कुटुंबातून गोष्टी सांगणारी खरीखुरी आजी आता हद्दपार होतेय. तिची जागा आता आभासी आजीने घेतल्याचे दिसत आहे. असेही निरीक्षणआहे की, समाजमाध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे माणूस व्यक्तीकेंद्रित झाला. कुटुंब व समाजाचे नियंत्रण त्यामुळे सैल
झाले. परिणामतः मूल्यात्मक घसरण मोठ्या प्रमाणात झाली. गेल्या दहा वर्षांतील कुटुंब, समाजामध्ये झालेल्या बदलाकडे दृष्टीक्षेप टाकला, तर अनेक कुटुंबातून अनैतिकता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजेच भारतीय कुटुंबसंस्थेवर एक मूल्यात्मक जो पगडा होता तो आता सैल झाल्याचे दिसत आहे. अल्पवयीन मुला-मुलींनी पळून जाऊन विवाह करणे व यापैकी काही विवाह हे विवाहयोग्य वय होताच कायदेशीर करणे, भलेही हे विवाह पुढे टिकतील की नाही, व किती टिकतील हे सांगता येत नाही; परंतु अशा संबंधालादेखील मान्यता आहे का? ज्या खेड्यांमध्ये मूल्यात्मक प्रभाव आहे, असे आपण म्हणतो, त्या खेड्यातदेखील अप्रत्यक्ष स्वरुपात मान्यच आहे, असे म्हणायला हरकत नाही, अशी परिस्थिती आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास एकप्रकारे अनैतिक कृत्याचे उदात्तीकरण होत आहे.
पूर्वी मुले, मुली परस्परांच्या चेहऱ्याकडे बघत नव्हते. प्रेमविवाह हे विरळाच व्हायचे. अर्थात पूर्वी स्त्रियांना तेवढं स्वातंत्र्य नव्हतं. व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीने तेवढी जागृती नव्हती. हल्ली शिक्षण दारोदारी पोहोचलं; परंतु माणसं सुसंस्कृत होऊ शकली नाहीत. हल्ली तरुण पिढी व वरच्या वयोगटातील व्यक्तींमध्ये देखील वाचनाचे प्रमाण कमी झालेले आहे. सातत्याने मोबाईल मुला-मुलींसमोर किंवा वयस्कर स्त्री-पुरुषांसमोर आरशासमान असल्याने व नको त्या गोष्टीचा प्रभाव जर मुले, मुली वा स्त्री-पुरुषांच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असेल, तर चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाची अपेक्षा कशी करणार ? मग अशाने समाजात अनैतिकता व व्यभिचार वाढणार नाही का?
पूर्वी प्रेम करताना नातेसंबंधामध्ये किमान नाती विचारात घेतली जायची. आतेबहीण-भाऊ, वा मामेबहीण-भाऊ अशाप्रकारे प्रेमप्रकरण व्हायचे. वा परस्परांच्या ओळखीतूनदेखील प्रेमसंबंध जुळायचे; परंतु आता तर कुटुंबातच मुला-मुलींमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात. एवढेच नाहीतर सख्या बहीण-भावामध्येदेखील प्रेमसंबंध होतात.
आणि शारीरिक संबंधदेखील स्थापीत होतात. अनैतिकता, नवविवाहित जोडप्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. एक- दोन महिने राहून जोडपी विभक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. प्रामुख्याने शासकीय, खासगी वा कार्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या मुला-मुलीना अफीम, गांजा, चरस, दारु अशा प्रकारची व्यसने असतात. टार्गेट बेस काम असल्यामुळे व अमाप पैसा असल्यामुळे आपला थकवा घालविण्यासाठी ते अशा प्रकारची व्यसने करतात. परिणामतः वैवाहीक जीवनात त्यांना अनेक अडचणी येतात. आज कार्पोरेट जगतात पैसा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रत्येकाचा अहंकार वाढला आहे. समायोजन साधायला कुणीही तयार नाही. मग जोडपी विभक्त होतात. त्यामुळे कुटुंब विघटनाच्या समस्या निर्माण होत आहे.
गलेलठ्ठ पगारावर किंवा कार्पोरेट क्षेत्रात पती, पत्नी नोकरीवर असणारे दोघेही परस्परांवर फारसे अवलंबून राहतात, असे नाही. प्रत्येक व्यक्ती ही स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहेच. पुरुषाबरोबरच स्त्री स्वयंपूर्ण होणे, हा त्यांचा अधिकार आहेच. मानवीय अधिकाराचा विचार केला तर कोणीही हे नाकारू शकत नाही. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये जी दरी निर्माण होते, त्याला हे एक कारण आहेच. अर्थात यामध्ये कुणाला एकालाही म्हणजे पुरुष किंवा स्त्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणे हे न्याय्य नसेल. खरेतर आपला पगार वा पॅकेज कितीही असो, परंतु पती-पत्नी म्हणून उभयंता एक परिपक्व नाते निर्माण होणे गरजेचे असते. पती-पत्नींमध्ये एक नैसर्गिक नाते निर्माण होऊन एक विश्वास निर्माण होण्याची देखील गरज आहे, असे परस्परांवरील विश्वासपूर्ण नाते हे संसार सुव्यवस्थित चालण्यासाठी गरजेचे असते. परस्परांच्या विश्वासपूर्ण नात्यातूनच जोडीदाराला कळते की, आपला सखा, सहचारिणी जन्मोजन्मीचे साथी आहे.
आजपर्यंत कुटुंबसंस्था बऱ्यापैकी शाबूत असली, तरी भविष्यकाळ मात्र त्या दृष्टीने पूरक असेल असे सांगता येत नाही. भविष्यात विवाहसंस्थेचे अस्तित्व टिकून राहील की, नाही हा मोठा प्रश्न आहे.
भारतीय समाजव्यवस्थेत घटस्फोट जर शिष्टसंमत ठरत असेल, तर यापेक्षा आणखी दुर्दैव काय असेल. कुटुंबसंस्थेच्या उद्ध्वस्तीकरणामुळे आणखी नव्याने काही प्रश्न निर्माण होत आहेत. पती-पत्नी जर विभक्त होत असतील तर कुटुंबातील वृध्दांचे काय? मुलामुलींच्या संगोपनाचेदेखील प्रश्न निर्माण होतात. समाजव्यवस्थेचा गाडा सुव्यवस्थित पध्दतीने चालण्यासाठी जी एक आदर्श कुटुंबसंस्था हवी असते ती कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त होत असेल तर समाजव्यवस्थेचे काय ? हा यक्ष प्रश्न आ वासून उभा राहतो.
प्रा. डॉ. अरुण शेंडे
यवतमाळ,
मो. नं. - ९६२३४३३४३८