ओमानच्या किनाऱ्याजवळ प्रोजेक्टाइलचा मारा
नवी दिल्ली (Hormuz ship attack) : ओमानच्या किनाऱ्याजवळ होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असलेल्या पनामा-ध्वजांकित व्यावसायिक जहाजावर मंगळवारी प्रोजेक्टाइलने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील 12 कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी 11 जण भारतीय नागरिक आहेत. ‘एमटी ऑन पीस’ या जहाजावर एकूण 19 कर्मचारी होते. त्यापैकी 17 जण भारतीय असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.
हल्ल्यानंतर ओमानी प्रशासनाच्या मदतीने जखमी कर्मचाऱ्यांना जहाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यांना ओमानमधील खसब येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती आणि हल्ल्याची नेमकी तीव्रता याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
हल्ल्यामागील पक्षाबाबत स्पष्टता नाही
या (Hormuz ship attack) हल्ल्यामागे नेमका कोणता पक्ष आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. घटनेची अधिक माहिती मिळविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग मानला जातो.
भारताकडून हल्ल्याचा निषेध
या (Hormuz ship attack) घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे. व्यापारी जहाजे, खलाशी आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणारे हल्ले तातडीने थांबविण्याची मागणी परराष्ट्र मंत्रालयाने केली. तसेच आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील सुरक्षित नौवहन सुनिश्चित करून व्यापार सुरळीत करण्याचे आवाहन भारताने केले आहे.