A.R. Rahman Son

ए.आर. रहमान यांचा मुलगा ए.आर. अमीनचा चेन्नईत अपघात; थोडक्यात बचाव, उपचारानंतर डिस्चार्ज

प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांचा मुलगा, गायक आणि संगीत निर्माता ए.आर. अमीन याचा चेन्नईमध्ये कार अपघात झाला.

ए.आर. रहमान यांचा मुलगा ए.आर. अमीनचा चेन्नईत अपघात; थोडक्यात बचाव, उपचारानंतर डिस्चार्ज

गिंडी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास पोर्श कारला वॅगन-आरची धडक; अमीन आणि मित्राला किरकोळ दुखापत

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांचा मुलगा, गायक आणि संगीत निर्माता ए.आर. अमीन याचा चेन्नईमध्ये कार अपघात झाला. गिंडी परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत अमीन आणि त्याच्या मित्राला किरकोळ दुखापत झाली. उपचारानंतर अमीनला रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी देण्यात आली असून, या घटनेत तो सुदैवाने बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमीन आपल्या पोर्श कारमधून प्रवास करत होता. त्याच्यासोबत एक मित्रही होता. याचदरम्यान साइड रोडवरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या रॅपिडोच्या वॅगन-आर कारची अमीनच्या वाहनाला धडक झाली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, वॅगन-आर मुख्य रस्त्यावर येत असताना हा अपघात घडला.

अपघातानंतर ए.आर. अमीन आणि त्याच्या मित्राला तातडीने कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दोघांवर उपचार करण्यात आल्यानंतर अमीनला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, वॅगन-आरमधील व्यक्तीलाही दुखापत झाली असून त्याला कलैग्नर सेंटेनरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

२०२३ मध्येही थोडक्यात बचावला होता अमीन

ए.आर. अमीन याच्यासोबत यापूर्वीही एक गंभीर दुर्घटना घडली होती. २०२३ मध्ये गाण्याच्या शूटिंगदरम्यान क्रेनला लावण्यात आलेला जड झुंबर आणि ट्रस अचानक त्याच्यावर कोसळला होता. त्यावेळीही अमीन सुदैवाने बचावला होता.

ए.आर. अमीन हा प्लेबॅक सिंगर आणि म्युझिक प्रोड्यूसर म्हणून संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. ‘दिल बेचारा’ आणि ‘2.0’ यांसारख्या चित्रपटांसाठी त्याने गाणी गायली आहेत.