जिंतूर-परभणी महामार्गावर कोक गावा जवळील घटना मयतामध्ये आजोबा, आजी,नातवाचा समावेश
परभणी (Parbhani ST-Bike Accident) : बोरी येथील जिंतूर-परभणी महामार्गावर कोक या गावाजवळ एसटीबस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. हि घटना शनिवार ६ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. मयतामध्ये आजोबा, आजी, नातवाचा समावेश आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी या गावाजवळुन काही अंतरावर असलेल्या कोक या ठिकाणी जिंतूर परभणी महामार्गावर रोहिला पिंपरी फाटा आहे. (Parbhani ST-Bike Accident) जिंतूर तालुक्यातील शेवडी येथील भगवान बळीराम काळे वय ५० वर्ष, कुसाबाई भगवान काळे वय ४० वर्ष व शिवम गजानन काळे वय १२ वर्ष हे तिघे शनिवारी सकाळी कौडगाव येथे मेव्हण्या कडे धोंडे जेवणा करीता गेले होते. धोंडे जेवण घेऊन दुचाकी वरुन रोहिला पिंपरी येथुन बोरी मार्गे शेवडी गावाकडे जाण्यासाठी निघाले. कोक जवळील रोहिला पिंपरी फाट्या जवळ दुचाकी आल्यानंतर जिंतूर हुन परभणीकडे जाणार्या एमएच १३ सीयु ७८३३ या बसने दुचाकीला जोराची धडक दिली.या भिषण अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिपककुमार वाघमारे, सपोनि रामेश्वर धोंडगे, पोउपनि.एस. एम. थोरवे, व्हि.एस.लाड,शेख वसीम यांनी घटनास्थळी भेट दिली. कोकचे सरपंच वहिद खान पठाण, संदिप झाडे व अशरफ खान पठाण यांनी गावकर्यांच्या मदतीने एसटीखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढून रूग्णालयात पाठविले. अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने शेवडी गावावर शोककळा पसरली आहे.
गतीरोधकाचा अभाव ; अपघातांचे सत्र
जिंतूर -परभणी महामार्गावर कोक गावाजवळ रोहिला पिंपरी फाटा आहे. महामार्गापासून पिंपरीकडे जाणार्या रस्त्यावर जंक्शनरोड तयार करण्यात आलेला नाही. तसेच या फाट्यावर गतीरोधक सुध्दा नाहीत. या (Parbhani ST-Bike Accident) मार्गावरुन भरधाव धावणार्या वाहनांमुळे अपघात होत आहे. सदर ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.