दुहेरी खून प्रकरण

दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

Latur Double Murder Case: डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात पाच आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावल

दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

Latur Double Murder Case

 

निलंगा अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल; डांगेवाडीत पाणंद रस्त्याच्या वादातून घडलेले प्रकरण

लातूर (Latur Double Murder Case) : डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात पाच आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. या प्राणघातक हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर चौघे जखमी झाले होते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 3 ऑक्टोबर 2019 रोजी डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या कारणावरून आरोपींनी शेतात काम करीत असलेल्या सुभाष दयानंद सुडे, दयानंद नामदेव सुडे व इतरांवर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सुभाष दयानंद सुडे व दयानंद नामदेव सुडे यांचा मृत्यू, तर अन्य चार जण जखमी झाले होते. याप्रकरणी मयत सुभाष सुडे यांचा मुलगा नामदेव सुभाष सुडे यांच्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 150/2019, कलम 302, 307, 148, 147, 143, 504 सह 149 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे तसेच जप्ती पंचनाम्यांसह उपलब्ध सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या (Latur Double Murder Case) खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण 14 साक्षीदार तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी व जखमी साक्षीदार तसेच जप्ती पंच यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. उपलब्ध साक्षी-पुराव्याच्या आधारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. बी. पवार, निलंगा यांनी ज्ञानोबा अंगद ओनामे, जगन्नाथ विश्वंभर ओनामे, राजकुमार विश्वंभर  ओनामे, राम बाबुराव ओनामे व भागवत बाबुराव ओनामे. (सर्व रा. डांगेवाडी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) या आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली.

या पाचही आरोपींना कलम 302 सह 149 भादंवि अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने अतिरिक्त कारावास; कलम 307 सह 149 भादंवि अन्वये 5 वर्षे कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास; तसेच कलम 148 भादंवि अन्वये 3 वर्षे, कलम 147 भादंवि अन्वये 2 वर्षे आणि कलम 143 भादंवि अन्वये 6 महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

या (Latur Double Murder Case) प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता कपिल व्ही. पंढरीकर यांनी बाजू मांडली. त्यांना जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. व्ही. देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच अॅड. सी. जे. सबनीस-पाटील यांनी सहाय्य केले. कार्यालयीन कामकाजासाठी एच. जी. बिरादार (कनिष्ठ लिपिक) तसेच कोर्ट पैरवी कर्मचारी सौ. ए. जी. कांबळे यांनी सहकार्य केले.