नवाबपुरा परिसरातील घटनेत आकाश ढोमने गंभीर जखमी; गणेश वानखेडे याच्यावर हल्ल्याचा आरोप
नागपूर: कौटुंबिक वादातून नागपूरच्या महाल परिसरातील नवाबपुरा येथे एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. एका महिलेचा पूर्वीचा पती गणेश वानखेडे आणि तिचा सध्याचा पती आकाश ढोमने यांच्यात मुलाच्या संगोपनावरून सुरू असलेल्या वादाने गंभीर स्वरूप घेतले. या हल्ल्यात आकाश ढोमने जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचा योग्य सांभाळ होत नसल्याच्या मुद्द्यावरून गणेश वानखेडे आणि आकाश ढोमने यांच्यात काही काळापासून मतभेद होते. सोमवारी सकाळी या वादाचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. गणेशने आकाशवर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे.
हल्ल्यात जखमी झाल्यानंतर आकाशने स्वतःचा बचाव करण्यासाठी स्कूटरवरून तेथून निघण्याचा प्रयत्न केला. तो बडकस चौक परिसरात पोहोचला. त्यानंतर जखमी अवस्थेत स्कूटर सोडून त्याने ऑटोरिक्षेने रुग्णालय गाठले. दरम्यान, त्याची स्कूटर आणि रस्त्यावर रक्ताचे डाग दिसून आले.
RSS मुख्यालयाजवळ हल्ला झाल्याची अफवा
बडकस चौक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर असल्याने घटनेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज आणि अफवा पसरल्या. RSS मुख्यालयाजवळच एका व्यक्तीवर हल्ला झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
मात्र, नागपूर पोलिसांनी ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी घटनेबाबत खुलासा करताना सांगितले की, हल्ला RSS मुख्यालयाजवळ झालेला नाही. हा प्रकार महाल परिसरातील नवाबपुरा येथे कौटुंबिक वादातून घडला आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ चर्चेला उधाण आले होते. मात्र पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर RSS मुख्यालयाशी या घटनेचा कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.