शिक्षक अपघाती मृत्यू 

पिकअपने बुलेटला दिलेल्या धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू 

Teachers Accidental Death: सेनगाव-रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर भरधाव पिकअपने बुलेट दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि. ३० मे रोजी रात्

पिकअपने बुलेटला दिलेल्या धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू 

Teachers Accidental Death

 

सेनगाव- रिसोड महामार्गावर भीषण अपघात; वरुड चक्रपान गावावर शोककळा

सेनगाव (Teacher Accidental Death) : सेनगाव-रिसोड राष्ट्रीय महामार्गावरील वळणावर भरधाव पिकअपने बुलेट दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि. ३० मे रोजी रात्री घडली. या अपघातामुळे वरुड चक्रपान गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शैक्षणिक क्षेत्रावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरुड चक्रपान येथील गजानन मधुकर पत्की आणि संतोष देसाई हे शनिवारी रात्री बुलेट दुचाकीवरून प्रवास करत होते. सेनगाव शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील महामार्गाच्या वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बुलेटचे मोठे नुकसान झाले आणि दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची (Teacher Accidental Death) माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह सेनगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या  माहितीनुसार, संतोष देसाई यांनी शनिवारी जनगणनेचे काम पूर्ण केल्यानंतर वरुड चक्रपान येथे आगमन केले होते. त्यानंतर ते गजानन पत्की यांच्यासोबत सावरखेडा येथे आयोजित नगरभोजन कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून दोघेही आपल्या गावाकडे परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मृत गजानन पत्की हे भंडारी तांडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन बहिणी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. तर संतोष देसाई हे चिखलागर तांडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.

दोघेही शिक्षक मनमिळाऊ, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनामुळे शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून वरुड चक्रपान परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेण्यात आले असून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.