पोलिसांच्या धडक कारवाईने अवैध व्यवसायीकांचा २१ लाखांचा मुद्देमाल जप्त
हपोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांच्या हस्ते डीवाएसपी मयुर रसाळ यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मान पत्र बहाल
हिंगोली (Police Officer Mayur Rasal) : जिल्ह्यात अवैध धंद्यांचे जाळे तोडण्यासाठी पोलिसांनी उघडलेला एक महिन्याचा 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी ठरला आहे. वाळू तस्करी, मटका, अवैध दारू आणि गुटखा विक्री करणार्यांवर आठ ठिकाणी छापे मारून हिंगोली पोलिसांनी तब्बल २१ लाख २२ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईचे शिलेदार ठरले उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर रसाळ, पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून मयुर रसाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा व भरवसा सेलला सोबत घेत थेट मैदानात उतरले.
गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी वाळू माफियांपासून गुटखा माफियांपर्यंत सर्वांनाच सळो की पळो करून सोडले. एका महिन्यात जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये ८ गंभीर गुन्हे दाखल झाले. सर्वात मोठी कारवाई बासंबा येथे झाली. अन्न सुरक्षा कायद्याखाली धाड टाकून पोलिसांनी ७ लाख ३८ हजारांचा गुटखा साठा जप्त केला. सेनगावमध्ये वाळू माफियांवर कारवाई करत ७ लाख १० हजारांचे वाहन व वाळू ताब्यात घेतली. कळमनुरीत दोन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये ५ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल हाती लागला.
याशिवाय हिंगोली शहर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातंर्गत २७ हजार ५० रुपये, ग्रामीणमध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमातंर्गत छाप्यात २४०० रुपयाचा मुद्देमाल यासह मटका आणि अवैध दारू अड्ड्यांवर कारवाई झाली. या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी मयूर रसाळ यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. 'कर्तव्यदक्ष अधिकार्यांमुळे खात्याची शान वाढते' अशा शब्दांत त्यांनी रसाळ (Police Officer Mayur Rasal) यांचे कौतुक केले. पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या या कौतुकाच्या थापेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलाचे मनोबल सध्या उंचावले आहे. अवैध व्यवसायिकांमध्ये पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता धडकी भरली आहे. हिंगोलीत 'ऑपरेशन क्लीन' सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलीस दलाने दिले आहेत.