जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती गृह मंत्रालयाने मागवली; सोलापूर जिल्ह्यात ११७ पदे भरली जाणार
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच तब्बल ८१०० पोलीस पदांची भरती केली जाणार असून, त्यासाठी गृह मंत्रालयाच्या पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या पदांची माहिती गृह मंत्रालयाने मागवली आहे.
या आगामी भरतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११७ पोलीस पदांचा समावेश असणार आहे. नवीन वर्षात म्हणजेच २०२७ मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
यंदा १५,६३१ पोलिसांची भरती
राज्य सरकारकडून सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विक्रमी पोलीस भरती झाल्याचे सांगण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून दरवर्षी पोलीस भरती केली जात आहे.
यावर्षी राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती झाली आहे. त्यानंतर आता २०२७ मध्येही मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात जाण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
जून २०२७ पर्यंतची रिक्त पदे भरणार
जून २०२७ पर्यंत राज्यात रिक्त होणाऱ्या जवळपास ८१०० पोलीस पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. मागील भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण जूनपासून सुरू झाले आहे. त्याचबरोबर पुढील पोलीस प्रशिक्षण फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे नवीन पोलीस भरतीची प्रक्रिया जानेवारी २०२७ पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये अर्ज, मार्चपर्यंत भरती प्रक्रिया
आगामी ८१०० पदांच्या पोलीस भरतीसाठी उमेदवारांना १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत अर्ज करता येणार असल्याची माहिती आहे.
यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे लक्ष्य ठेवणाऱ्या तरुण-तरुणींनी वेळ न दवडता आतापासूनच लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि आवश्यक तयारीवर भर देणे फायदेशीर ठरणार आहे.