जिल्हा परिषद अभियंता संघटनेचा दुष्काळ ग्रस्तांसाठी मदतीचा हात
हिंगोली (Chief Minister's Aid Fund) : राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने, विशेषतः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी- नाले, विहिरी, तलाव कोरडे पडले असून शेतातील पिके करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद अभियंता संघटना, महाराष्ट्र यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये (Chief Minister's Aid Fund) १० लाख रुपयांची स्वतंत्र मदत जमा करण्यात येणार असून, संघटनेच्या राज्यभरातील सुमारे ४००० सभासद अभियंत्यांचे एक दिवसाचे वेतन, अंदाजे दीड कोटी रुपये, दुष्काळ ग्रस्तांसाठी देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष सचिन चव्हाण (चंद्रपूर), मुख्य सल्लागार तथा माजी राज्याध्यक्ष सुहास धारासूरकर (परभणी), कार्याध्यक्ष हेमा कुलकर्णी (पुणे), महासचिव प्रदीप हुपरे (कोल्हापूर) आणि कोषाध्यक्ष रा.ना. कुलकर्णी (हिंगोली) यांनी दिली.
ग्रामीण भागात विविध लोककल्याणकारी योजना राबवत असल्याने जिल्हा परिषद अभियंत्यांचा शेतकऱ्यांशी नित्याचा संबंध येतो. त्यामुळे सध्याच्या नैराश्याच्या काळात शेतकऱ्यांना धीर देणे ही काळाची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे. मागील ३० वर्षात विविध नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संघटनेने शासनाला वेळोवेळी भरीव मदत केली आहे.
या निर्णयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत हिंगोली जिल्हा परिषदेतील ६७ सभासद अभियंत्यांनी एक दिवसाचे वेतन कपात करण्यास सहमती दर्शविली आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष रा.ना. कुलकर्णी, सचिव संदेश जाधव, कार्याध्यक्ष ए.बी.खान, कोषाध्यक्ष सचिन कोकडवार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.