तक्रार निवारण समितीची तातडीने बैठक घेऊन शासनास अहवाल व प्रस्ताव पाठवा;
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांची मागणी
चिखली (Vinayak Sarnaik) : खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाने दीर्घ खंड दिल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर हळद पिकासाठी लागू असलेल्या हवामान धोक्याच्या निकषांचा व शासन निर्णयाचा आधार घेऊन सोयाबीन उत्पादक व हळद उत्पादक शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई द्यावी. तसेच तालुका तक्रार निवारण समितीची तातडीने बैठक घेऊन शासन व संबंधित पीकविमा कंपनीकडे अहवाल व प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक (Vinayak Sarnaik) यांनी केली आहे.
यासंदर्भात सरनाईक (Vinayak Sarnaik) यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी चिखलीचे तहसीलदार तथा तालुका तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष आणि तालुका कृषी अधिकारी तथा समितीचे सचिव यांना निवेदन दिले.या संदर्भात ना तहसिलदार श्री मुरलीधर गायकवाड यांच्या सोबत मुद्दे निहाय व शासन निर्णय व त्यामधील तरतुदीनुसार चर्चा करण्यात आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाचे असमान व अपुरे प्रमाण राहून अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडला. त्यामुळे सोयाबीनसह,हळद,तुर ,मुंग, उडीद विविध खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे सोयाबीन पिकाची वाढ, शेंगा भरणे तसेच अंतिम उत्पादनावर परिणाम झाला असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
शासनाने बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश केला असून, यावरून पावसाचा खंड व प्रतिकूल परिस्थिती स्पष्ट होते. त्यामुळे पावसाची प्रतिकूलता व त्याचा शेतीवर झालेला परिणाम पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करताना विचारात घ्यावा, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. तसेच तालुका तक्रार निवारण समितीची तातडीने बैठक घेऊन सोयाबीन पिकाच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घ्यावा आणि संबंधित पीकविमा कंपनी व शासनाकडे अहवाल व प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नजर अंदाज आणेवारीसह प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करा
पीकविमा योजनेत केवळ अंतिम उत्पादनाची आकडेवारी न पाहता पावसाचा खंड, दुष्काळी परिस्थिती, नजर अंदाज आणेवारी, प्रत्यक्ष पिकांची स्थिती, नुकसानीचे पंचनामे आणि पीक कापणी प्रयोगातून निश्चित होणारे उत्पादन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
हळदीप्रमाणे सोयाबीनसाठीही हवामान धोक्याचा निकष लागू करा
पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन पिकावर झालेल्या परिणामाचा विचार करून पावसाच्या खंडाचा ‘ट्रिगर’ लागू करावा व पात्र शेतकऱ्यांना पीकविमा नुकसानभरपाई द्यावी. यासाठी हळद व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा मिळणेसाठी संबंधित पीकविमा कंपनी व जिल्हास्तरीय समितीकडे शिफारस करण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
मागील वर्षीची घोषणा यंदा पुन्हा नको!
मागील वर्षी मुख्यमंत्री यांनी ओल्या दुष्काळात पीकविमा देण्याची घोषणा केली होती विशेष मदत पॅकेज जाहीर केले तेव्हा शेतकऱ्यांना हेक्टरी १८०००रू हेक्टरी प्रमाणे पिक विमा देऊ अशी घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीकविमा मिळाला नाही,तेव्हा फक्त नूकसान भरपाई हेक्टरी केवळ ₹८,५०० मिळाली. यंदा केवळ घोषणा न करता पावसाच्या खंडाचा ‘ट्रिगर’ पीकविमा शासन निर्णयात समाविष्ट करावा किंवा फळपीक विम्याच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन सोयाबीन, उडीद व मूगला पीकविमा द्यावा, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी केली.