गाव महसूल नोंद

५० वर्षांपासून गाव अस्तित्वात, तरी महसूल नोंदच नाही

Village Revenue Record: सुमारे ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या गावाची स्वतंत्र महसूल अभिलेखात नोंद नसल्याने ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद

५० वर्षांपासून गाव अस्तित्वात, तरी महसूल नोंदच नाही

Village Revenue Record

 

टवेटोलावासीयांचे तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन, स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा देण्याची मागणी

काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांचे साकडे, पाणी, रस्ता, वनहक्क पट्ट्यांचाही प्रश्न

कोरची (Village Revenue Record) : गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील दुर्गम टवेटोला गावाला स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली टवेटोलावासीयांनी तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले. सुमारे ५० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या गावाची स्वतंत्र महसूल अभिलेखात नोंद नसल्याने ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टवेटोला हे पिटेसुर ग्रामपंचायतीअंतर्गत येणारे आदिवासीबहुल आणि अतिदुर्गम गाव आहे. प्रशासकीय नोंदीत हे गाव ग्यारापत्तीचा टोला म्हणून दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात ग्यारापत्तीपासून तब्बल सात किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात टवेटोला वसलेले आहे. पिटेसुर ग्रामपंचायतीच्या मुख्य गावापासूनही हे गाव सुमारे पाच किलोमीटर अंतरावर आहे.

गावात सध्या सहा घरे असून ३९ नागरिक वास्तव्यास आहेत. यामध्ये १८ वर्षांखालील १५ तर १८ वर्षांवरील २४ नागरिकांचा समावेश आहे. एवढ्या वर्षांपासून गाव अस्तित्वात असूनही स्वतंत्र महसूल गाव म्हणून नोंद नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

शासकीय कागदपत्रांवर गावाचे नाव, मग महसूल नोंद का नाही?

टवेटोलावासीयांच्या रेशन कार्ड, आधार कार्ड तसेच मतदार ओळखपत्रावर टवेटोला गावाचे नाव नमूद आहे. त्यामुळे विविध शासकीय कागदपत्रांवर गावाचे अस्तित्व मान्य असताना महसूल अभिलेखात स्वतंत्र गाव म्हणून नोंद का करण्यात आलेली नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महसूल नोंद नसल्यामुळे गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविताना अडचणी येतात. स्वतःच्या हक्कांसाठी ग्रामस्थांना तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि अन्य शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी नाल्यावर अवलंबून

टवेटोल्यात सार्वजनिक विहीर किंवा बोअरवेलची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना कच्च्या विहिरी तसेच नाल्यातील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. विशेषतः पावसाळ्यात पाण्याची समस्या अधिक गंभीर बनते. दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने गावात तातडीने स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून यापूर्वी बोअरवेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गटविकास अधिकारी राजेश फाये यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी बोअरवेलसाठी वाहन गावाकडे पाठवण्यात आले होते. मात्र खराब रस्ता आणि नाल्यातील पाण्यामुळे वाहन गावापर्यंत पोहोचू शकले नाही. आता येत्या काही दिवसांत गावात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बारमाही रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल

टवेटोल्याला बारमाही पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना जंगलातील कच्च्या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अधिक खराब होत असल्याने गावाचा संपर्कही धोकादायक बनतो. आजारी व्यक्ती, गरोदर महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना या समस्येचा सर्वाधिक फटका बसत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना उपचारासाठी बाहेर नेणेही मोठे आव्हान ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांची पायवाटेवरून रोजची कसरत

गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ग्यारापत्ती येथील शाळेत जावे लागते. यासाठी त्यांना दररोज जंगलातील पायवाटेचा आधार घ्यावा लागतो. सात किलोमीटरचे अंतर, पावसाळ्यातील खराब परिस्थिती आणि रस्त्याचा अभाव यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच गावाला बारमाही रस्ता देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

वनहक्क पट्टे आणि सामूहिक वनहक्क दाव्यांची मागणी

स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा देण्याबरोबरच टवेटोल्यातील पात्र नागरिकांना वनहक्क पट्टे मंजूर करावेत तसेच सामूहिक वनहक्क दावे निकाली काढावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. जंगल परिसरात पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्यांच्या हक्कांची कायदेशीर मान्यता मिळावी, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.

प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची मागणी

टवेटोलावासीयांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत गावाच्या सर्व समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. केवळ आश्वासनांवर न थांबता गावाला स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा देण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पाणी, रस्ता, शिक्षण आणि वनहक्क या मूलभूत प्रश्नांसोबतच गावाची स्वतंत्र प्रशासकीय ओळख निर्माण होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सुमारे अर्धशतकापासून अस्तित्वात असलेल्या टवेटोल्याला शासकीय कागदपत्रांवर ओळख आहे; मात्र महसूल अभिलेखात स्वतंत्र गाव म्हणून नोंद नाही. त्यामुळे “कागदोपत्री ओळख असताना महसूल नोंद का नाही?” हा ग्रामस्थांचा सवाल आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे. प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि टवेटोल्याला स्वतंत्र महसूल गावाचा दर्जा कधी मिळतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

यावेळी तहसीलदार प्रशांत गड्डम तसेच गटविकास अधिकारी राजेश फाये यांना निवेदन देण्यात आले निवेदन देतावेळी काँग्रेस पक्ष कोरचीचे तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, कोटरा ग्रामपंचायत चे माजी सरपंच तुलाराम मडावी, सामाजिक कार्यकर्ते संतोष एक्का, सुमित्रा गोटा, वैशाली गोटा, जास्मिन गोटा, माया गोटा, सामोबाई गोटा, मंगोबाई गोटा, घसोंती उसेंडी, मनकायबाई तुलावी, घनश्याम गोटा, रामदास उसेंडी, कृष्णा गोटा, हेमंत उसेंडी, सुरेश पुडो, राजेश गावडे आदी उपस्थित होते.

टैग्स: Village Revenue Record