हिंगोलीतील बाजार समितीच्या मोंढ्यात हळद खरेदीतील दिरंगाई विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असताना वजन-मापाच्या अपुऱ्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हिंगोलीतील बाजार समितीच्या मोंढ्यात हळद खरेदीतील दिरंगाई विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

Turmeric Farmers Issue

हिंगोली (Turmeric Farmers Issue) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक होत असताना वजन-मापाच्या अपुऱ्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी बाजार समितीच्या माजी संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या हिंगोली बाजार समितीत हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. मात्र वजन काट्यांची संख्या कमी असल्याने आणि मनुष्यबळ अपुरे असल्याने वजन प्रक्रियेला ४ ते ५ दिवसांचा विलंब होत आहे. कडाक्याच्या उन्हात शेतकऱ्यांना उघड्यावर मुक्काम करावा लागत असून, यामुळे त्यांच्या मालाच्या सुरक्षिततेवर आणि गुणवत्तेवर परिणाम होत आहे. वेळेवर विक्री न झाल्याने अपेक्षित भाव मिळत नसल्याचेही माजी संचालकांनी म्हटले आहे.

माजी संचालकांनी दिलेल्या निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत—

  • बाजार समितीत वजन काट्यांची संख्या तातडीने वाढवावी
  • वजन प्रक्रियेसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करावी
  • शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन व नियोजन व्यवस्था सुरू करावी
  • हळद विक्रीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी प्रणाली सुरू करून वेळापत्रकानुसार वजन करावे
  • हळदीचा योग्य हमीभाव जाहीर करून शासकीय खरेदी तातडीने सुरू करावी

बाजार समितीवर सध्या प्रशासक नियुक्त असतानाही शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी संचालकांनी केला आहे.

या निवेदनावर माधव कोरडे, मनिष आखरे, अशोक सिरामे, परमेश्वर मांडगे, गजानन घ्यार, सौ. गिताबाई मुटकुळे, सुमनबाई डोरले, उत्तमराव वाबळे, गणेश जाधव, रवि डोरले, राजकुमार सूर्यवंशी, शिवशंकर शिंदे, गजानन तळेकर, गजानन वाबळे, शामराव जगताप आदी माजी संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, हमीभावाने शासकीय खरेदी सुरू करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. हळदीला हमीभाव मिळाल्यास खुल्या बाजारातील दरांवर नियंत्रण येऊन शेतकऱ्यांची लूट थांबेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; शिवसेनेच्या 'धडक' मोर्चाने MSEB कार्यालय हादरले!

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; शिवसेनेच्या 'धडक' मोर्चाने MSEB कार्यालय हादरले!

मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा बांध अखेर फुटला!

May 06, 2026