नागपूर कराराच्या विरोधात आंदोलन; कराराची होळी
घोट (Swatantra Vidarbha Elgar) : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी घोट येथे विदर्भ आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने जोरदार एल्गार पुकारण्यात आला. नागपूर कराराला २८ सप्टेंबर १९५३ रोजी ७३ वर्षे पूर्ण होत असताना, करारातील तरतुदींची अपेक्षित अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी नागपूर कराराची होळी केली.घोट येथील मुख्य बसस्थानक चौकात आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात “स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा” तसेच “घोटला तालुक्याचा दर्जा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसोबतच घोट तालुका निर्मितीसह स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नही यावेळी ठळकपणे मांडण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ आंदोलन संघर्ष समितीचे दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार यांनी केले.यावेळी माजी पोलीस पाटील अविनाश वडेटीवार, प्रा. सी. के.कांबळे, अंनिसचे कार्याध्यक्ष आसिफ सय्यद, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामदास कामेलवार,मोतीराम लाटेलवार,दिनकर लाकडे, रमेश श्रृंगारपवार, गिरजाशंकर उपाध्ये,बंडू जुवारे, उमेश सरकार, बबलू शहा,अमित शहा, पुरुषोत्तम चलाख, विलास वडेटीवार,पंढरी डाहाके, शिवराम गुरनुले यांच्यासह शेकडो विदर्भवादी नागरिक उपस्थित होते.
दरम्यान,आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घोट पोलिसांच्या वतीने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.नागपूर कराराची होळी करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. पोलिसांच्या पुढाकारामुळे आंदोलन शांततेत पार पडले.